शुक्रवार, १८ मे, २०१८

जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी कटिबध्द .. मुख्यमंत्री

सांगली, दि. 18, (जि.मा.का.) : महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत  राज्यातील 11 हजार  गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच जलसंधारणातून दुष्काळमुूक्तीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगरपरीसरात पाणी फौंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून  त्यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे  प्रमुख शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्याचा 50 टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता, या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीव्दारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली  आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होवू लागले.  राजकारण,  गट-तट बाजूला सारुन लोकं पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेवून गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे.
पाणी फौंडेशनने दुष्काळमुक्तीसाठी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फौंडेशनने जलसंधारणाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मॉडेल तयार करून या कामात गावागावांचा सहभाग घेतला. त्यामुळे अनेक गावात जलसंधारणाची क्रांतीकारी लोकचळवळ उभी राहिली आहे. आज गावाचा धर्म, जात, पार्टी, गट या सर्वांचे ध्येय केवळ पाणी झाले आहे. सर्वजण एकदिलाने, एकजुटीने पाण्यासाठीच काम करीत आहेत, ही सर्वार्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 सारे आवंढी गाव जलसंधारणाच्या कामासाठी मैदानात उरतले असून दुष्काळ पराजीत होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. गेल्या 50 वर्षात होऊ शकलेले काम केवळ एका वर्षात आवंढीकरांनी केले आहे. पाण्याचे शास्त्र समजून घेवून निसर्गाच्या वाटा शोधून जलसंधारणाचे काम केले, हे राज्याला दिशादर्शक आहे, असा गौरवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आवंढीच्या गावकऱ्यांकडून केलेले जलसंधारणाचे काम लाख मोलाचे असून गेल्या 45 दिवसापासून अथक मेहनत करणाऱ्या गावकऱ्यांसमवेत काही वेळ श्रमदान करता आले याचे समाधानही त्यांनी व्यक्त केलेे.
पाणी आहे तिथे जीवन आहे. पाणी आहे तिथे समृध्दी आहे. अशी पाणीदार समृध्दी गावकऱ्यांच्या ताकदीतून निर्माण करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फौंडेशनबरोबरच जैन संघटनेने जलसंधारणाच्या कामासाठी केलेले सहकार्य कौतुकाचे आहे. पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या गावांना विशेषत: आवंढी गावकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आवंढी येथील जलयुक्त शिवारच्या कामाच्या अनुषंगाने डिझेल संदर्भातील प्रश्न निश्चितपणे दूर करू. जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आवंढीकरांची एकजूट दुष्काळमुक्तीसाठी उपयुक्त असून राज्याच्या इतर गावांना  ती प्रेरणादायी असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसमवेत जलंधारणाच्या कामामध्ये श्रमदान केले. त्यामुळे काम करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला पाणी फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली.
सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी मान्यवरांचे स्वागत केले भटकीमळा परीसरात सुरू असलेल्या जलसंधारण कामांची माहिती दिली. ते म्हणाले, आवंढी गावात आज भटकीमळा येथे 40 हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाचे काम सुरू असून त्यामध्ये कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी, डिप सीसीटी, मातीनाला बांध, दगडी बांध अशी जलसंधारणाच्या माथा ते पायथा जलसंधारण प्रणाली राबविल्याची माहिती दिली.
समारंभास माजी महापौर सुरेश पाटील, नीता केळकर, जैन संघटनेचे जिल्हा प्रमुख राजगोंडा पाटील, पाणी फौंडेशनचे जिल्ह्याचे प्रमुख सत्यवान देशमुख, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील, उपसरपंच  प्रदिप कोडग यांच्यासह आवंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा