गुरुवार, ३१ मे, २०१८

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून सामाजिक परिवर्तन सांगली जिल्ह्यात 53 हजार 130 गॅस जोडण्या

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत 53 हजार 130 गॅस जोडण्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील गरीबातील गरीब कुटुंबांचे सामाजिक परिवर्तन या माध्यमातून घडून आले आहे. या योजनेतून देशभरात 3 कोटी 80 लाख महिलांना घरगुती गॅस जोडणी देण्यात आली आहे. देशातील प्रत्येक 100 कुटुंबांपैकी 81 कुटुंबामध्ये गॅस आहे, याबद्दल या योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच समाधान व्यक्त केले.
    स्वच्छ इंधन, बेहतर जीवन असा नारा देत चुलीत जळणाऱ्या इंधनातून निर्माण होणाऱ्या धुरापासून ग्रामीण भागातील गरीब महिलांची मुक्तता झाली आहे. त्यातून महिलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण अशा दोन्ही बाबी घडून आल्या आहेत. याबाबत योजनेचे सांगली जिल्हा नोडल अधिकारी राहुल पाटील म्हणाले, गेल्या आठवड्यापर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कंपनीमार्फत एकूण 13 हजार 585 गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 20 वितरक असून, 423 गॅस जोडण्या थकित आहेत. तर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमार्फत 30 हजार 293 गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 39 वितरक असून, 1280 गॅस जोडण्या थकित आहेत. इंडियन ऑइल कंपनीमार्फत 9 हजार 261 गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 8 वितरक असून, 377 गॅस जोडण्या थकित आहेत. जिल्ह्यात तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 53 हजार 139 गॅस जोडण्या देण्यात आल्या असून जवळपास 2 हजार 80 गॅस जोडण्या देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
    प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांच्या वेळेत बचत झाली असून, हा वेळ कुटुंबासाठी सत्कारणी लावता येणे शक्य झाले आहे. स्वच्छ इंधनापासून पर्यावरणाची सुरक्षा झाली असून, निसर्गाची सेवा झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होऊ लागले आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घेणे गरजेचे आहे.
    महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम दूर करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीला केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रावर जावून भरावा लागतो. त्यासाठी 100 रूपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. अर्ज सादर करताना अर्जदाराला दोन व्यक्तींचा आधार कार्ड क्रमांक तसेच बँक खात्याचा नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत भरलेले अर्ज एसईसीसी 2011 या डाटासोबत जोडून तपासण्यात येतात. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना आणी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्याला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरिता 1600 रूपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येते. त्याबरोबरच सिलेंडर रिफिल आणी एलपीजी स्टोव्ह कर्जाव्दारे उपलब्ध आहे.   
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा