बुधवार, २ मे, २०१८

पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज व सतर्क राहावे - प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण

आदर्श आचार संहिता अंमलबजावणी, कायदा सुव्यवस्थेबाबत बैठकीत सूचना

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जिल्ह्यात होत असलेली पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीेने आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सज्ज सतर्क राहावे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आज दिल्या.
पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना शेटे आणि राजेंद्र पोळ, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील पवार, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी पैशाची मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा अन्य संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात करण्याच्या सूचना देऊन प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, मतदारांना प्रलोभन ठरतील, अशा वस्तूंची वाहतूक होऊ शकते, अशा ठिकाणी पोलीस उत्पादन शुल्क विभागाने चेक पोस्ट सुरू करावेत. या पथकाने योग्य ती तपासणी करून बेकायदेशीर वस्तू जप्त करून कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी सूचित केले.
आचारसंहिता भंगाची तक्रार स्वीकारण्यासाठी त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. तसेच, एक खिडकी योजना राबवावी, अशा सूचना देऊन प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, रोख रकमांच्या मोठ्या व्यवहारावर सर्व संबंधित ठिकाणी नजर ठेवावी. तारण, वित्तीय, हवाला दलाल यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवावे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.
भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या आदर्श आचारसंहितेतील तरतुदींचे काटेकोर पालन करावे. विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स प्रसिद्ध करू नयेत. राजकीय पक्षांनी उमेदवारानी पूर्व परवानगी शिवाय बैठकीचे आयोजन करू नये, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र मालमत्ता विरूपण करणे प्रतिबंधक कायदा 1955 नुसार या कायद्याची योग्य रितीने अंमलबजावणी करावी. जिल्ह्यामध्ये आचारसंहितेच्या पालनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. आचारसंहितेचे पालन करून ही निवडणूक शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहिता लागू झाली असल्याने नवीन कामांना मंजूरी देता येणार नाही. तसेच नवीन कामांबाबत कार्यारंभ आदेश देण्यात आले असले तरी ही कामे चालू करता येणार नाहीत. भूमिपूजन, उद्घाटन करता येणार नाही. आचार संहितेचा भंग झाल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा