बुधवार, ३० मे, २०१८

तंबाखुचे सेवन संपेल जीवन

   सृष्टीवरील सर्व सजीव प्राण्यांचे जीवन अमुल्य आहे. पण त्यातल्या त्यात मानवी जीवन म्हणजे वरदान मानले जाते. मानव आपल्या भौतिक सुखासाठी जीवनात प्रचंड प्रमाणात धडपड, मेहनत करतो या सर्व धडपडीच्या जीवनात थोडासा विरंगुळा, शरीराला आराम मिळावा यासाठी काही वेळेला व्यसनांच्या आहारी जातो. प्रारंभी ही व्यसने काही प्रमाणात बरी वाटतात पण त्यांच्या आहरी गेल्यानंतर हीच व्यसने उग्र रुप धारण करुन मानवाचे जीवन संपवतात. या व्यसनापैकी एक व्यसन म्हणजेच तंबाखुचे व्यसन किंवा तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन. ही व्यसन जगाचीच समस्या बनली आहे. 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच तंबाखुजन्य व्यसनांबाबत थोडंस जाणून घेवूया..


     तंबाखुने होणाऱ्या विविध आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. तंबाखुचा शरीराच्या प्रत्येक भागावर हानीकारक परिणाम होत असतात. तंबाखु कोणत्याही स्वरुपात - खाल्ला तरी शरीराला हानीकारकच आहे. सुरुवातीला तंबाखू ही औषधी समजली जायची. पण सोळाव्या शतकापासून तंबाखूच्य्या अनिष्ट परिणामांची शंका डॉक्टरांना येऊ लागली आणि तंबाखु अथवा तंबाखुजन्य पदार्थ सेवन हे व्यसन असल्याचे सिध्द झाले.
   तंबाखू सेवन करण्याच्या अनेक पध्दती आहेत. भारतात तंबाखू चुन्याबरोबर मळून खातात. पानात चुना, सुपारी, कात तंबाखू घालून त्याचा विडा करतात. नुसताच बार भरणारे लोक दिवसभर तंबाखू तोंडात ठेवतात. ही गोळी गालात किंवा खालचा ओठ हिरडी यांच्यामध्ये ठेवतात. काही लोक विशेषत: तरुण गुटखा खाणे या नवीन फॅशनच्या आहारी जातात. पानात गुंडाळलेली तंबाखू म्हणजे विडी कागदात गुंडाळलेली ती सिगारेट. विडी, सिगारेट, पाईप, सिगार हुक्का यात तंबाखू एका टोकाला जळत ठेवण्यात येते. तिचा धूर तोंडातून घशावाटे छातीत ओढून पुन्हा श्वसनमार्गे शरीरातून तोंड नाकाव्दारे बाहेर सोडला जातो.
   काही लोक तर पेटलेली बाजू तोंडात धरुन धुम्रपान करतात. काही जण तपकिरीच्या रुपाने तंबाखू नाकातून श्वसनमार्गे ओढतात. कित्येक लोक तंबाखू जाळून त्याची मिशरी करतात ती दातांना हिरड्यांना लावतात. या तंबाखू सेवनाच्या उपरोक्त पध्दतीपैकी धुम्रपान, तंबाखू खाणे गुटखा ह्या जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पध्दती आहेत.
तंबाखुचे दुष्परिणाम
   धुम्रपानाने होणारे दुष्परिणाम - भूक लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिकेत किंवा पोटात "व्रण" होणे, धुम्रपानाचा जास्तीत जास्त वाईट परिणाम - श्वसनसंस्था रक्ताभिसरण संस्था यावर होतो. फुप्फुसाचे श्वसनसंस्थेचे आजार वारंवार होतात. रक्तदाब वाढणे, ह्दयाला इतर महत्वाच्या अवयांना रक्तपुरवठा कमी होणे हे दुष्परिणाम होतात. प्रदीर्घ धुम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. महिलांच्या बाबतीत ह्या शिवाय- गर्भात विकृती निर्माण होणे, कमी वजनाचे बालक जन्माला येणे,गर्भपात होणे किंवा मृत बालकाचा जन्म होणे या बाबी घडू शकतात.
   पानातून किंवा चुन्याबरोबर तंबाखू खाल्याने हेच सर्व दुष्परिणाम शरीरात होतात त्याबरोबर तोंडाचेही अनेक रोग होऊ शकतात. तंबाखूबरोबरच्या चुन्यामुळे तोंडातील नाजूक अशा त्वचेला व्रण पडून त्यामुळे तेथे कर्करोग होऊ शकतो. सिगारेटच्या धुरात एकंदर चार हजार प्रकारची विविध रसायने असतात. त्यातील सर्वच्या सर्व शरीराला अपायकारक आहेत काही रसायने अत्यंत विषारी आहेत. उदा. स्टार, निकोटीन, हायड्रोसायनिक ऍ़सिड, कार्बन मोनोक्साईड इत्यादी. धुम्रपानातून निघालेल्या धुराचा त्रास धुम्रपान करणाऱ्या परंतु शेजारी बसलेल्या व्यक्तिलाही होऊ शकतो हा परिणामही तेवढाच घातक असतो.
   तंबाखू खाण्याचे अलीकडच्या काळात नवीन प्रकार आले आहेत. त्यामध्ये  गुटख्यामधील तंबाखू किंवा तंबाखूचा अर्क, मावा, सुपारी, चुना, सुगंधी द्रव्ये यांचा समावेश करून खाणे. ह्या बरोबरच इतरही काही मेंदूवर परिणाम करणारी घातक द्रव्ये गुटख्यामध्ये घातली जातात, जेणेकरुन लवकर तलफ भागू शकेल. परंतु यामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण वाढते. गुटख्याचा तोंडाच्या आतील त्वचेवर वाईट असा परिणाम अत्यंत जलद गतीने होतो काही दिवसात त्या व्यक्तिला तोंड उघडणेही दुरापास्त होते. याशिवाय तंखाखूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तर आहेतच.
   तंबाखूचे सेवन कसे थांबवावे- विडी-सिगारेट ओढणे बंद करायला सर्वप्रथम प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. कारण तंबाखूची सवय झालेल्या माणसाला विडी-सिगारेट सोडली की निश्चितच अस्वस्थ वाटू लागते. याचे कारण हे की तंबाखूमधील निकोटीन काहींना दारुपेक्षाही अधिक व्यसनासक्त करते. असे असले तरी हे व्यसन सोडणे अशक्य नसते.
   सर्वसाधारणपणे मनुष्य वेगवेगळ्या वेळी विडी - सिगारेट ओढत असतो. रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होते आणि मग तंबाखुची आस लागते. सिगारेट सोडलेल्या माणसाला त्याच्या सवयीच्यावेळी तलफ येते. अशा वेळी ग्लासभर पाणी पिणे, पेपरमिट चोखणे, शतपावली करणे,यासारख्या क्रिया केल्या तर तलफ कमी होते. महिना दोन महिन्यांत तंबाखुची आस नष्ट होते. तंबाखु गुटख्याचे सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. तरी तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावे समाजातील स्वयंसेवी संस्था आणि घटकांनी तंबाखु, गुटखा खाणाऱ्या लोकांना या व्यसनापासून प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी मेळावे, चर्चासत्रे आयोजित करुन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
   अलिकडे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रोज मोलमजुरी करणारे कामगार यांच्यामध्येही कामात उत्साह येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंबाखू, गुटख्याचे सेवन केले जाते. त्यामुळे क्षणीक काळासाठी उत्साह वाढतो परंतु आयुष्याची वाट लागते. भारतात कॅन्सरचे प्रमाण वाढण्यामागे हेच कारण आहे. यासाठीच युवा पिढीने तंखाखू गुटख्याच्या व्यसनापासून चार हात लांब राहून स्वत:च्या आरोग्यासाठी, भविष्यासाठी दूर राहण्याची नितांत गरज आहे. नाहीतर तंबाखुचे सेवन संपेल जीवन हे वाक्य खरे ठरेल.
                
                               जिल्हा माहिती कार्यालय,
                               सांगली
                
00000


  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा