गुरुवार, ३१ मे, २०१८

अतिसार नियंत्रण

अर्भक मृत्यूदर बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक उद्दिष्ट आहे. 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालक मृत्यूचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते. याकरिता दिनांक 28 मेपासून जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त अतिसाराची लक्षणे उपाययोजनांचा घेतलेला हा विशेष आढावा...
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1 लाख 95 हजार 268 लाभार्थीकरिता आशांमार्फत गृह भेटी बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी प्रतिबंधात्मक स्वरूपात एका ओआरएस पाकीटाचे वाटप करण्यात येणार आहे. दर दिवशी 4 ते 5 घरातील पालकांना एकत्रित करून ओआरएसचे घोळ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. बालकांचे स्तनपान, पूरक आहार, स्वच्छता बाबत माताचे समुपदेशन करण्यात येणार आहे. 9 जून 2018 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.               
लक्षणे - बाळाची हालचाल मंदावणे किंवा बाळ बेशुध्द होणे. डोळे खोल जाणे, द्रव पदार्थ पिण्यास त्रास होणे किंवा अजिबात पिता येणे. त्वचा चिमटीत घेऊन सोडल्यावर तिथली त्वचा खूपच हळूहळू पुर्ववत होणे. अस्वस्थ / चिडचिड करणारे बाळ, तहानलेले खूप भरभर पाणी पिणे. 14 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जुलाब होत असल्यास. संडासावाटे रक्त पडत असल्यास.
काय करावे  - बाळाला ताबडतोब दवाखान्यात दाखवले पाहिजे. त्यादरम्यान आईला वारंवार जलसंजीवनीचे द्रावण पाजायला सांगावे. द्रव पदार्थ तसेच झिंकची मात्रा तसेच आराखड्यामध्ये दिल्याप्रमाणे अन्न पदार्थ द्यावेत. अतिसारासाठीची औषधे द्यावीत. 2 दिवसांनी परत तपासावे पाठपुरावा करावा. 
उपयुक्त पदार्थ - स्तनपान, लिंबूपाणी, ताक / दह्याचे पाणी, तांदळाचे पाणी, डाळीचे पाणी, भाज्यांचे सूप, ताज्या फळांचा रस (साखर घालता), साधे स्वच्छ पाणी. अपायकारक पदार्थ - सॉफ्ट ड्रींक्स, साखर घातलेला फळांचा रस, कॉफी.
बालकास अतिसार सुरू असताना एकाच वेळी झिंक आणि ओआरएस देऊ शकता. झिंक दिवसातून एक वेळ 14 दिवसापर्यंत ओआरएससह ओआरएस अतिसार बरा होईपर्यंत देऊ शकता. झिंक हे ओआरएसमध्ये मिसळू शकते. मात्र 2 ते 6 महिने बालकांसाठी 1/2 गोळी आईच्या एक चमचा दुधामध्ये (5 मिली) विरघळून द्यावे 6 महिने ते 5 वर्षे वयाच्या बालकांमध्ये एक गोळी 5 ते 10 मिली ओआरएस द्रावणांमध्ये मिसळून द्यावी. जास्त प्रमाणातील ओआरएस द्रावणांमध्ये झिंक मिसळू नये कारण एका दिवसात घ्यावयाचा झिंकचा डोस पूर्ण होऊ शकणार नाही.
जरी झिंक देत असाल तरी पुष्कळ प्रमाणामध्ये ओआरएस नियमितपणे देणे गरजेचे आहे. ओआरएस हे अतिसारामुळे झालेली जलशुष्कता भरून काढण्याचे काम करते. झिंक हे लवकर बरे होण्यासाठी कामी येते त्याने बालकाचा पुढे 2 ते 3 महिन्यांपर्यंत अतिसारापासून बचाव होऊ शकतो. झिंक हे भूक वाढविते बाळाची वाढ होण्यास मदत करते. ओआरएस झिंक हे दोन्ही देणे आवश्यक आहे. झिंक हे अतिसाराच्या उपचारासाठी पूरक आहे. पण ओआरएसची जागा घेऊ शकत नाही. ओआरएस हे अतिसाराच्या उपचारासाठी जलशुक्षतेची तीव्रता कमी करण्यासाठी देण्यात येते. झिंक हे अतिसाराची तीव्रता कालावधी कमी करते पण शरीरातील कमी होणाऱ्या पाण्याचे प्रमाण भरून काढत नाही.
अतिसार बंद झाल्यानंतर झिंकच्या गोळ्या देणे आवश्यक आहे. कारण झिंक हे फक्त अतिसारास बरे करण्यात मदत करत नाही तर पोटातील आतड्यांना बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते.  झिंक हे 14 दिवसापर्यंत देण्यात यावे. झिंक घेतल्याने मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत नाहीत. फक्त किरकोळ स्वरूपात उलटी होण्याची शक्यता असते. बालकास बहू जीवनसत्वाची मात्रा देत असताना झिंक दिल्यास कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. झिंक हे सुरक्षित औषध आहे. जर बाळाला अतिसार होत असेल तर झिंकचे प्रमाण बरेच कमी होते. म्हणून अधिक झिंक देणे हे चांगले आहे.
झिंकची मात्रा देण्याची पध्दत - 2 ते 6 महिन्याच्या बाळासाठी स्वच्छ कप घेऊन त्यामध्ये मातेचे दुध घ्यावे. झिंकची अर्धी गोळी (10 मि.ग्रॅ.) कपामध्ये टाकावी. कपातील गोळी पूर्ण विरघळेपर्यंत कपाला हळूहळू हलवावे. हे पूर्ण द्रावण बाळाला पाजावे. 6 महिने ते 5 वर्षाच्या बाळासाठी स्वच्छ कप घेऊन त्यामध्ये पिण्याचे पाणी घ्यावे. झिंकची एक गोळी (20 मि.ग्रॅ.) कपामध्ये टाकावी. कपातील गोळी पूर्ण विरघळेपर्यंत कपाला हळूहळू हलवावे. हे पूर्ण द्रावण बाळाला पाजावे. अतिसारामध्ये होणारे जलशुष्कता (डिहायड्रेशन) यावर उपचार म्हणून जलसंजीवनी (ओआरएस) याचा वापर करावा.
पुढीलपैकी लक्षण आढळल्यास बाळाला तात्काळ रूग्णालयात संदर्भित करावे - 2 महिन्यापेक्षा लहान वयाचा असल्यास, संडासावाटे रक्त पडत असल्यास, तीव्र स्वरूपाचे डिहायड्रेशन    झाले असल्यास, स्तनपान घेण्यात अडचण येत असल्यास किंवा द्रवपदार्थ पिण्यास त्रास होत असल्यास, खाल्लेल सगळं उलटून पडत असल्यास, आकडी येणे, बाळाच्या हालचाली मंदावणे किंवा बाळ बेशुध्द होणे, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होणे आणि धाप लागणे किंवा निमोनिया असणे, तीव्र कुपोषण, डायरिया / जुलाब 14 दिवसांपेक्षा अधिक काळ रहाणे.

                  संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा