सोमवार, २८ मे, २०१८

पशुसंवर्धन विभागाकडील योजनांचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत  ठाणबंद पध्दतीने शेळी पालन आणि मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन या दोन योजना राबवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र पशुपालकांनी त्यांचे अर्ज परिपूर्ण भरून पशुधन विकास अधिकारी (विस्तार), संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये दिनांक 1 ते 30 जून 2018 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाटे यांनी केले आहे.
ठाणबंद पध्दतीने शेळी पालनासाठी 10 + 1 शेळी गट वाटप करणे आणि 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय करणे या दोन योजना राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. 10 + 1 शेळी गट वाटप करणे या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 55 आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी 36 या प्रमाणे एकूण 91 लाभार्थीचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे 1 हजार मांसाल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय करणे या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 24 आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी 14 या प्रमाणे एकूण 38 लाभार्थींचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळी पालनासाठी 10 + 1 शेळी गट वाटप करणे या योजनेंतर्गत उस्मानाबादी जातीच्या पैदासक्षम 10 शेळ्या 1 बोकड याप्रमाणे एका गटासाठी 87 हजार 857 रूपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना 50 टक्के म्हणजे 43 हजार 929 रूपये तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लाभार्थीसाठी 75 टक्के म्हणजेच 65 हजार 893 रूपये याप्रमाणे अनुदान देय आहे.
1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटमध्ये 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षी गृह बांधकामाचा इतर साहित्याचा अपेक्षित खर्च 2 लाख 25 हजार रूपये गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना 50 टक्के म्हणजे 1 लाख 12 हजार 500 रूपये तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लाभार्थीसाठी 75 टक्के म्हणजेच 1 लाख 68 हजार 750 रूपये याप्रमाणे अनुदान देय आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मिरज या कार्यालयाशी संपर्क साधावा.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा