बुधवार, २ मे, २०१८

इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रचारासाठी जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक - प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जिल्ह्यात होत असलेली पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या वतीने किंवा अपक्ष उमेदवाराच्या वतीने दूरदर्शन वाहिन्या, केबल नेटवर्क तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या राजकीय मजकूर असलेल्या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समितीचे पूर्वप्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले, पूर्वप्रमाणपत्रासाठी उमेदवाराने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाहिरात प्रसारण कालावधीपूर्वी किमान 3 दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रचार करण्यासाठी उमेदवार किंवा प्रचार प्रमुखाचा अर्ज, उमेदवार प्रतिनिधी असल्यास तसे उमेदवाराचे पत्र, दोन प्रतीत प्रचार मजकुराची संहिता (स्क्रिप्ट), प्रचार मजकुराच्या दोन सीडी, जाहिरातीचा उत्पादन प्रस्तावित प्रसारण खर्च, प्रचारसाहित्य निर्मिती कर्त्याचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक सीडीमध्ये संहितेमध्ये असावे, निर्मिती खर्चाचे देयक अदा केल्याची पावती, प्रचार साहित्य, संहिता सीडीमध्ये प्रकाशकाचे नाव, दिनांक संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. सीडीमध्ये जुने चित्रीकरण वापरले असल्यास संग्रहित लिहिणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनीही याबाबतची माहिती समितीला वेळोवेळी द्यावी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा