गुरुवार, ९ जून, २०२२

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी ई-केवायसी जुलै 2022 पुर्वी करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण केली नाही त्यांनी तात्काळ e-KYC जुलै 2022 पुर्वी करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची e-KYC करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सध्यस्थितीत दि. 8 जून 2022 अखेर जिल्ह्यातील 4 लाख 36 हजार 584 नोंदणीकृत लाभार्थी पैकी 2 लाख 42 हजार 37 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित 1 लाख 94 हजार 547 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण प्रलंबित आहे. पी. एम. किसान योजनेचे दोन हजार रूपयाचे तीन हप्ते एक वर्षासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत आणि ते हप्ते चालु ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची e-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना पी. एम. किसानसाठी e-KYC अपडेट करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. सर्वात प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. वेबसाईटवर आल्यानंतर पेजच्या उजव्या बाजुला दिसणाऱ्या e-KYC वर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून सर्च वर क्लिक करावे. त्यानंतर जो आधार कार्डशी लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकावा व Get OTP वर क्लिक करावे आणि OTP प्राप्त झाल्यानंतर तो भरावा व सबमिट करावे. पी.एम. किसान योजनेंतर्गत ऑफलाईन e-KYC प्रक्रिया सीएससी केंद्रावर जावून करता येईल. पीएम किसान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात दि. 8 जून 2022 पर्यंत तालुकानिहाय नोंदणीकृत लाभार्थी, e-KYC पूर्ण झालेले लाभार्थी, e-KYC प्रलंबित असलेल्या लाभार्थींची संख्या व सीएससी व्दारे केलेली e-KYC अनुक्रमे पुढीलप्रमाणे. आटपाडी - 31 हजार 930, 15 हजार 898, 16 हजार 32, 9 हजार 715. जत - 73 हजार 636, 43 हजार 831, 29 हजार 805, 31 हजार 607. कडेगाव - 36 हजार 942, 20 हजार 823, 16 हजार 119, 9 हजार 403. कवठेमहांकाळ - 30 हजार 568, 16 हजार 291, 14 हजार 277, 10 हजार 860. खानापूर - 27 हजार 132, 12 हजार 19, 15 हजार 113, 6 हजार 266. मिरज - 57 हजार 880, 29 हजार 516, 28 हजार 364, 18 हजार 910. पलूस - 25 हजार 669, 14 हजार 11, 11 हजार 658, 5 हजार 310. शिराळा - 37 हजार 919, 23 हजार 916, 14 हजार 3, 14 हजार 570. तासगाव - 44 हजार 456, 24 हजार 631, 19 हजार 825, 16 हजार 312. वाळवा - 70 हजार 452, 41 हजार 101, 29 हजार 351, 26 हजार 97. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा