सोमवार, १३ जून, २०२२

सांगली जिल्ह्यात उद्यमिता यात्रा २०२२ ला सुरूवात

उद्योग आणि स्थानिक बाजार निर्मितीला चालना देण्यासाठी ही ऐतिहासिक चळवळ ठरेल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये उद्यमिता यात्रेचा प्रारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून जे छोटे उद्योजक आहेत, विशेषत: ज्या महिला उद्योजक आहेत, कोरोनामुळे घरातल्या कमवित्या पुरूषांचा मृत्यू झाल्यामुळे आता उद्योग करू इच्छितात अशा महिला व इतर छोटे उद्योजका यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छोटे उद्योजक, महिला उद्योजकांना प्रशिक्षणानंतरही मदत व मार्गदर्शनाचे काम आपण एकत्रितपणे करू. स्थानिक रोजगाराच्या निर्मितीसाठी, स्थानिक व्यवसायची निर्मिती होणे ही काळाची निकड झालेली आहे. व्यवसाय मार्गदर्शन आणि निर्मितीचा उपक्रम हाती घेतलेली ही उद्यमिता यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तळागाळातील लोकांना उद्योजक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. स्थानिक रोजगार, उद्योग आणि स्थानिक बाजार निर्मितीला चालना देण्यासाठीची ही एक ऐतिहासिक चळवळ ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांगली जिल्हा उद्यमिता यात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील गवळी, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम, युथ एड फांऊडेशन पुणे चे संस्था प्रमुख मॅथ्यू मट्टम, युथ एड फांऊडेशनचे जिल्हा समन्वयक ज्ञानू कांबळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ कशा पध्दतीने घ्यावा, उत्पादन पॅकेजींग करून विकणे, त्याला मार्केट उपलब्ध करून देणे या छोट्या उद्योजकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सांगली जिल्ह्यात तीन दिवसाचे प्रशिक्षण घेतले जात आहे. याला निगडीत संस्था, सांगली जिल्ह्यातील सेवा सदन ट्रस्ट मदत करत आहे. शासनाची विविध कार्यालयेही या प्रकल्पासाठी जोडली गेली आहेत. एक पाऊल स्वयंरोजगाराकडे या हेतूने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून लघु उद्योजकतला प्रोत्साहन देणारा उपक्रम उद्यमिता यात्रा आहे. कोरोना महामारीचा फटका भारतालाही बसला. या एकंदरीत परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर त्यामुळे गदा आली आहे. लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. आता कोरोना ओसरला असताना या सर्व गोष्टींसाठी काम करणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने राज्यातल्या लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतलेले आहे. या अनुषंगाने युथ एड फाउंडेशन महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 मे रोजी मुंबईतून या यात्रेची सुरूवात झाली असून प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात 13 ते 15 जून या कालावधीत सांगली व कवठेमहांकाळ येथे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करून त्याच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे, त्या त्या भागाच्या अनुषंगाने व्यवसायांचे पर्याय सुचवणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशा प्रकारे शोधल्या पाहिजेत या बद्दल माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. नव्या व्यावसायिकांना बीज भांडवलासाठी देखील मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात नवे 4 हजार छोटे व्यावसायिक निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य हेतू आणि उद्देश असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातून मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. अशावेळी, स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळाल्यास स्थलांतराचा वेग कमी करता येईल. सोबतच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालनाही देता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा