गुरुवार, ९ जून, २०२२

बँकांतर्फे सांगली येथे ग्राहक जनसंपर्क अभियान

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : भारत सरकार वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत बँकांतर्फे “ग्राहक जनसंपर्क अभियान” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सक्रीय सहभागातून अग्रणी जिल्हा कार्यालय सांगली यांच्यावतीने “क्रेडीट ऑउटरिच कॅम्प” हा कार्यक्रम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक मिलिंद गवसाने, उप विभागीय प्रबंधक किरण पाठक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक संतोष गवळी, उप कृषि अधीक्षक प्रियंका भोसले, अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हरणे, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत कट्टी आदि उपस्थित होते. यावेळी श्री. होनमोरे यांनी पीएमएफएमई योजनेंतर्गत सर्व प्रलंबित प्रस्ताव पूर्ण करुन, ग्रामीण भागातील महिला, शेतकरी व तरुण उद्योजक यांना जिल्हा बँक परिपूर्ण सहयोग करील अशी ग्वाही दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी विविध शासकीय योजना, आर्थिक प्रगतीसाठी शेती व छोटे-मोठे उद्योग विकासासाठी बँक कटिबद्ध असल्याचे संगितले. जिल्हा परिषदेचे अतुल नांदरेकर यांनी बचत गटांना सुलभतेने कर्ज उपलब्ध करण्याचे आवाहन केले. आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत कट्टी यांनी आर्थिक साक्षरतेची गरज व महत्व विशद केले. या प्रसंगी मागील वर्षी शासकीय योजना प्रभावीपणे राबवून उत्कृष्ट काम केलेल्या 38 कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व बँकांच्या 72 लाभार्थ्यांना मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या मेळाव्यास आलेल्या व्यक्तींना बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे, लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप करणे, आर्थिक साक्षरता समुपदेशन, विविध जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा, व्यवसाय समन्वयक, अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कृत करणे इत्यादीचे प्रयोजन केले होते. या कार्यक्रमास सर्व बँक व शासकीय विभागाचे पदाधिकारी, ग्राहक, 200 पेक्षा अधिक लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप साळुंखे व राजश्री कुलकर्णी यांनी केले. बँक ऑफ इंडिया सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक राजकुमार बार यांनी आभार मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा