शुक्रवार, ३ जून, २०२२

संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज

हवामान विभागाने यावर्षी 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. ही कृषी व अन्य क्षेत्रांसाठी सुखावणारी बाब आहे. असे असले तरी कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, ढग फुटी सदृश्य पाऊस पडणे, धरण क्षेत्रात अतिवृष्टी यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अथवा संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सज्ज असून याबाबतचे योग्य नियोजन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. याबाबतच्या जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरच्या बैठका, कर्नाटक राज्याशी असलेला समन्वय, जलसंपदा व अन्य संबंधित विभागाने केलेली तयारी यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर निश्चितपणे मात करण्यात येईल. सन 2019 व 2021 या वर्षीच्या आलेल्या महापूराचा फार मोठा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी आहे. सन 2021 मध्ये महापूर आला पण कर्नाटक राज्याच्या प्रशासनासी केलेला योग्य समन्वय, धरणातील पाण्याच्या विसर्गाचे केलेले नियोजन यामुळे महाप्रलय टाळण्यात यश आले. हाच विश्वास बाळगून जिल्हा प्रशासन सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. नैसर्गिक आपत्ती बाबत त्वरीत माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला आहे. तसेच 0233-2600500 या क्रमांकावर माहिती ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुका पातळीवरील सर्व तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. गावपातळीवरील निष्णात पोहणाऱ्यांची यादी संकलित करुन त्यांचे दूरध्वनी क्रमांकही आपत्ती नियंत्रण केंद्रात उपलब्ध ठेवले आहेत. पूरबाधित गावांची संख्या 104 जिल्ह्यात 104 गावे पूरबाधित क्षेत्रात येतात. जिल्ह्यामधील 10 तालुक्यांपैकी शिराळा वाळवा, पलूस व मिरज या चार तालुक्यातून वारणा व कृष्णा नदीचा प्रवाह असल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका अधिक बसतो. जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदी काठाजवळील 104 गावांबाबत तसेच महानगरपालिका क्षेत्रात विशेष दक्षता प्रशासनाने घेतली असून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. सांग़ली जिल्ह्यामध्ये एकूण १०४ पूर प्रवण गावामध्ये गाव आपत्ती प्रतिसाद दल गठित करण्यात आलेले आहे. सन २०१९ व सन २०२२ चा महापूरचा अनुभव लक्षात घेता संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्यासाठी पूर प्रवण तालुक्यात एन.डी.आर.एफ. पुणे यांचे वतीने प्रशिक्षण संपन्न झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये आपत्तीची ओळख, शोध व सुटका पध्दती, प्रथमोपचार पध्दती, बोट चालविणे इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक स्वंयसेवी संस्था प्रतिनिधींनाही देण्यात आले आहे. आयर्विन पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 35, इशारा पातळी-40, धोकादायक पातळी-45 निश्चित करण्यात आली आहे. सन 2019 मधील उच्चतम पातळी-57.6 फूट होती. ताकारी पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 39, इशारा पातळी-44, धोकादायक पातळी-46, सन 2019 मधील उच्चतम पातळी-68.8 फूट होती. बहे पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 17, इशारा पातळी-21.9, धोकादायक पातळी-23.7, सन 2019 मधील उच्चतम पातळी-36.6 फूट होती. भिलवडी पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 46, इशारा पातळी-51 धोकादायक पातळी-53, सन 2019 मधील उच्चतम पातळी-64.6 फूट होती. तर अंकली पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 40, इशारा पातळी-45.11, धोकादायक पातळी-50.3, सन 2019 मधील उच्चतम पातळी-62.4. इतकी होती. पूरनियंत्रणासाठी उपलब्ध साधनसामुग्री पूरनियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेकडे 9 बोटी, जिल्हा परिषदेकडे-55 बोटी, महसूल विभागाकडे 19 बोटी अशा एकुण 83 बोटी उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यातील 17 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 170, टॉर्च- 34, रोप-51, बॅग-51,मेगा फोन-17, लाईफ रिंग-51, पलूस तालुक्यातील 21 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 210, टॉर्च- 42, रोप-63, बॅग-63,मेगा फोन-21, लाईफ रिंग-63, वाळवा तालुक्यातील 31गावांमध्ये लाईफ जॅकेट-310, टॉर्च-62, रोप-93, बॅग-93,मेगा फोन-31, लाईफ रिंग-93, शिराळा तालुक्यातील 6 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 60, टॉर्च- 12, रोप-18, बॅग-18,मेगा फोन-6, लाईफ रिंग-18, साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्याबरोबरच जिल्हा प्रशासनाने पुर्व तयारीच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ पुणे यांच्याकडील 2 पथके यामध्ये 25 जवान व 5 बोटी प्रत्येकी दिनांक 15 जूलै ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात उपलब्ध राहणार आहेत. पाटबंधारे विभागाची यंत्रणा सतर्क जिल्ह्यामध्ये व धरणाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती तसेच धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती संकलित करून दररोज किती पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाण्याची पातळी किती आहे याची माहिती नियंत्रण कक्षाला वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरण नियंत्रण प्रशासन यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील आर्यविन पूल, बहे पूल, ताकारी पूल, भिलवडी पूल, अंकली पूल येथील नद्यांच्या धोका पातळीची माहिती व इशारा अद्यावतपणे देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सांगली पाटबंधारे विभाग, सांगली येथे दि. 1 जून 2022 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष सुरू झाला आहे. या अंतर्गत कृष्णा उपखोऱ्यातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसार माध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2301820/2302925, फॅक्स क्रमांक 0233-2302750, मोबाईल क्रमांक 9307862396 असा आहे. हा पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अखंडित कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच महापूर रोखण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्या2साठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली (Real Time Data Acquisition System) ही प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील येवा, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. याचा उपयोग करून सन 2021 मधील महापूरात जिवीत व मोठ्या प्रमाणात वित्तहानी टाळण्यास मदत झाली होती. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सज्ज संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असून शहरात पॅचवर्क चे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरूमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय 24x7 पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे 92 नाले असून यांची साफसफाई सुरू आहे. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली आहे. पूरकाळात शवदहनाचा प्रश्न गंभीर होतो यासाठी कुपवाड येथील 8 स्मशानभूमी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरात आपत्ती मित्र ही संकल्पना राबविण्यात येत असून या अंतर्गत आत्तापर्यंत 200 जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे. तसेच आपत्ती मित्र ॲप ही महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपवर महापालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू लोकांना त्वरीत नैसर्गिक आपत्तीत घडलेल्या घटनांची माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्र.. 0233-2672100 असा आहे. पोलीस विभागानेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून तालुकापातळीवरही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. औषधे व धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध पुराच्या काळात रोगराई व साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली असून औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे पथकही त्या त्या भागात नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पूरग्रस्त गावातील लोकासांठी पुरेशा प्रमाणात धान्याचा साठाही सुरक्षित ठिकाणी करण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्यासाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी त्या त्या परिसरात शाळा व सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच बांधकाम, टेलिफोन, विद्युत विभागांनीही त्यांच्यास्तरावर जय्यत तयारी केली आहे. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास प्रशासन अहोरात्र यासाठी उपलब्ध राहणार आहेच. तरीही जनतेनेही प्रशासनास सहकार्य करून प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. श्री. रणजित पवार माहिती सहायक जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा