मंगळवार, १४ जून, २०२२

लहान गावांच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवा - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके वेळेत न भरल्याने पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे जेथे जेथे जागा उपलब्ध आहे तेथे तेथे छोट्या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवाव्यात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देूवन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी 30 जून अखेर पर्यंत प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनांचे कार्यादेश निर्गमित करण्याचे विभागाचे धोरण आहे, त्यामुळे यंत्रणांनी तातडीने आराखडे सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सांगली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांबाबत माधवनगर रोड येथील शासकीय विश्रामगृह येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव,ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, उपकार्यकारी अभियंता बी. जे. सोनवणे आदि उपस्थित होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 706 योजनांचा परिपूर्ण प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असून त्यापैकी 586 योजनांच्या कामांना तांत्रिक तर 485 कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. 356 कामांना कार्यादेश देण्यात आले असून यातील 314 कामे सुरू आहेत. तर 42 कामे पूर्ण झाली आहेत. सांगली जिल्ह्याचे जल जीवन मिशन अंतर्गत काम चांगले असले तरी या कामांवर झालेला खर्च तुलनेने कमी दिसत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निधी उपलब्धतेत केंद्राचा वाटा 50 टक्के, राज्याचा वाटा 50 टक्के व लोकवर्गणी 10 टक्के आहे. ही योजना 2024 पर्यंत राबविण्यात येणार असल्याने विहीत कालावधीमध्ये कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी दर आठवड्याला कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. नळ पाणी पुरवठा योजनांवर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ काटेकोरपणे घ्यावा. या योजनेच्या कामातील गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी योजनेशी आपली कामे विहीत मुदतीत पूर्ण करावीत, असे सांगून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील 26 योजना प्रस्तावित असून यातील 6 योजनांचे कार्यादेश दिले आहेत. या सर्वच्या सर्व योजनांची कामेही गतीने सुरू करावीत, असे निर्देश यंत्रणांना दिले. पाणी हा विषय संवेदनशिल असल्याने पाणीपुरवठ्या विषयी निवेदन घेवून येणाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. नळ पाणी पुरवठा योजनेतील कामांबाबत ज्या कंत्राटधारांचा पुर्वानुभव चांगला नाही त्यांना कामे देवू नयेत. जे कंत्राटदार कामे विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण करू शकतील त्यानांच कामे द्यावीत. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडील भुयारी गटार योजना कामांचा आढावा घेवून दीर्घ कालावधीनंतरही कामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भुयारी गटार योजना, शेरीनाला, वारणा उद्भवातून पाणी पुरवठा योजना या विषयांबाबत मंत्रालयात लवकराच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार अनिल बाबर यांनीही पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर घेण्यात याव्यात यासाठी आग्रही प्रतिपादन केले. तसेच आटपाडी साठी पाणीपुरवठा योजना तयार करताना ती ‍बिनचूक असावी याबाबत दक्षता घ्यावी, असे सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा