बुधवार, ८ जून, २०२२

प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा नागरिकांनीही पर्यावरणपूरक बाबींचा अधिकाधिक वापर करावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 8 (जि.मा.का.) : दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकल वापर प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्ह्यात प्लास्टिक कचरा किती संकलीत झाला याचा ताळेबंद ठेवून प्लास्टिक कचऱ्याचे मुल्यांकन, संकलन, पुनर्वापर यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. एकल वापर प्लास्टिक (एसयुपी) बंदी अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एन. एस. औताडे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एकल वापर प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार कोणकोणत्या बाबींवर बंदी आहे अशा बाबींची यादी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सर्व अंमलबजावणी यंत्रणांना उपलब्ध करून द्यावी, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या सर्व यंत्रणांनी अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अधिकारी प्राधिकृत करावेत. या अधिनियमांनुसार बंदी असणाऱ्या बाबींचे उत्पादन, विक्री, साठवण जिल्ह्यात होत नाही याची काटेकोर तपासणी करून कारवाई करावी. तसेच याबाबत जनजागृती करावी. केलेल्या कार्यवाहीचा कृती दलाच्या बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या, बांबूपासून बनणाऱ्या वस्तू, लाकडी वस्तू अशा पर्यावरणपूरक बाबींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एकल वापर (सिंगल युज प्लास्टिक) प्रतिबंधीत बाबींमध्ये सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टरर्स), 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे. तसेच कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी (कचरा व नर्सरी साठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज, नॉन वोवन बॅग्ज सह) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या, प्लास्टीक डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे), ग्लास इत्यादी बाबी प्रतिबंधित आहेत. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा