शुक्रवार, १० जून, २०२२

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

आपल्याकडे सर्वसाधारण प्रत्येक वर्षी जून महिन्यात मान्सून येतो व पावसाळ्यास सुरूवात होते. पावसाळ्यात दूषित पाणी, अन्न, डास यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो (अतिसार), अंमाश, विषमज्वर ( टायफॉईड), काविळ, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, सर्दी, खाकला, स्वाईन फल्यू आदी ‍साथीचे रोग होण्याची शक्यता असते. या रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी जाणून घेवूया विविध रोगांची लक्षणे, प्रसार व खबरदारीच्या उपाययोजनांबाबत.. गॅस्टो (अतिसार) विविध जीवाणू, विषाणू व परजीवी यांच्यामुळे अतिसार होतो. या रोगाचा प्रसार दूषित पाणी, अन्न, भाजीपाला, दूध यांच्या सेवनाने होतो. माशांमुळे रोगप्रसार होण्यास मदत होते. वारंवार पातळ शौचास होणे, उलटी होणे, पोटात कळ येणे, ताप येऊन अश्क्तपणा येणे, जलशुष्कता येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. लहान मुले, अशक्त व कुपोषित बालके, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या व्यक्ती हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रूग्णांच्या शौच तपासणीव्दारे केले जाते. कॉलरा व्हिब्रिओ कॉलरा नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. दूषित पाणी व अन्न यामुळे हा अजार पसरतो. परिसर अस्वच्छतेमुळे, माशांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे या रोगाची साथ उद्भवण्याची शक्यता असते. वारंवार जुलाब व उलटी, अतिशय तहान लागणे, पोटात कळा येणे, पायात गोळे येणे, शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्यामुळे जलशुष्कता संभवते, गंभीर अवस्थेत रक्त दाब कमी होणे, लघवी कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. वैयक्तिक अस्वच्छता असणारे, अस्वच्छ परिसरात राहणारे, वारंवार सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ/ पेय सेवन करणारे हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रूग्णांच्या शौच तपासणीव्दारे केले जाते. विषमज्वर (टाइफॉईड) सालमोनेला टाईफी या जीवाणूमुळे हा आजार होतो. यालाच मुदतीचा ताप असेही म्हणतात. दूषित पाणी व अन्नाव्दारे, अस्वच्छ हात, दुषित बर्फ याव्दारे या रोगाचा प्रसार होतो. सर्दी/फ्ल्यू सारखी सुरूवात होणे, वाढत जाणारा भरपूर ताप, डोकेदुखी, जीभेवर पांढरा थर साचतो ही या रोगाची लक्षणे आहेत. वारंवार सार्वजनिक ठिकाणी अन्न खाणारे लोक हे या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रक्ताची तपासणी (विडाल टेस्ट) व्दारे केले जाते. अमांश (डिसेंट्री) अमिबा या एकपेशीय आदिजीवामुळे होणारा हा आजार आहे. दूषित पाणी व अन्नाव्दारे या रोगाचा प्रसार होतो. पोटात दुखणे, शौचात आव व रक्त पडणे, वारंवार शौचास जावेसे वाटणे ही या रोगाची लक्षणे आहेत. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या व्यक्ती वसतिगृहे उपहारगृहे, खाणावळी तसेच उघड्यावर अन्न खाणारे हे या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान लक्षणावरून व शौच तपासणीव्दारे केले जाते. पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी हे करा : (१) पिण्यासाठी निर्जंतुक पाण्याचा वापर करा. (२) 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी प्यावे. (३) विहीरीचे किंवा कूपनलिकेचे पाणी पिऊ नये. (४) नळ गळती त्वरीत दुरूस्त करावी. (५) पाण्यात तुरटी फिरवून, क्लोरीन द्रावणाचा वापर करावा. (६) पाण्याची नियमित तपासणी करा. (७) पाणी शुध्दीकरणासाठी घरगुती साधनांचा वापर करावा. (८) पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावी. हे टाळा : (१) नळाची पाईप गटार, डबकी यांतून घेणे टाळा. (२) घरगुती नळ कनेक्शनसाठी पीव्हीसी पाईपचा वापर टाळा. अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी हे करा : (१) ताजे शिजलेले गरम अन्न खा. (२) भाज्या व फळे वापरापूर्वी स्वच्छ व वाहत्या पाण्यात धुवा. (३) दुधासारखे पातळ पदार्थ उकळून प्या. (४) स्वयंपाकापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. (५) अन्न उघड्यावर ठेवू नका. हे टाळा : (१) उघड्यावरील अन्न खाणे टाळा. (२) बाहेर खाणे, पिणे टाळा. (३) शिळे अन्न खाणे टाळा. (४) गाड्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांचे ज्यूस पिणे टाळा. कावीळ काविळ हा विषाणूमुळे होणारा आजार असून हिपॅटाईटिस ए व इ या विषांणूमुळे होणारी काविळ दुषित पाण्यामुळे / अन्नाव्दारे होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने दूषित पाण्याव्दारे, दूषित व उघड्यावरील अन्न खाल्यामुळे होतो. रूग्णाची भूक मंदावते, अशक्तपणा व थकवा जाणवतो, मळमळते, उलटी, ताप, पोटदूखी अशी लक्षण दिसतात, लघवी, डोळे व त्वचा पिवळी होते ही या रोगाची लक्षणे आहेत. गरोदर स्त्रिया हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगनिदानासाठी रक्ताची व लघवीची तपासणी केली जाते. लेप्टोस्पायरोसिस दूषित पाण्यापासून पसरणारा व लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. रोगबाधित प्राणी (उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी, कुत्री) यांच्या लघवीव्दारे बाहेर पडलेल्या जंतूमुळे दूषित झालेले पाणी, माती यांचा त्वचेवरील जखमांशी संपर्क आल्यामुळे रोगप्रसार होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मूत्रपिंड व यकृताचे काम बंद पडून मृत्यू येऊ शकतो ही या आजाराची लक्षणे आहेत. अनवाणी पायांनी शेतात काम करणारे, जनावरांची निगा राखणारे, पूरांच्या दूषित पाण्यामध्ये काम करणारे हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रोगनिदान रक्त व लघवीची तपासणी करून केले जाते. खबरदारीचे उपाय - दूषित पाणी, माती यांच्याशी संपर्क टाळावा, रबरी बूट, हातमोजे याचा वापर करावा, आजारी जनावरांवर त्वरीत उपचार करावेत, आजारी जनावचरांच्या लघवीचा मानवी संपर्क टाळावा, हातापयांना जखमा असल्यास अन्टीसेप्टिक मलमाचा वापर करावा, तसेच दूषित पाण्याशी संपर्क टाळावा. शौचाबाबत घ्यावयाची खबरदारी शौचालयाचा वापर करा, शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा, मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावा, बाळांची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. लहान मुलांना उघड्यावर शौचास बसवणे टाळा. वैयक्तिक स्वच्छता नियमितपणे हाताची नखे कापा, स्वयंपाकापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा, शौचाहून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. परिसर स्वच्छता मलमूत्रची योग्य विल्हेवाट लावा, तुंबलेल्या गटारी वाहत्या ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्या, कचऱ्यांचे ढिग साचू देऊ नका, कचरा उठावाबाबत वेळीच महापालिकेला सूचना करा. डेंग्यू ताप साठलेल्या पाण्यात वाढणाऱ्या एडिस ईजीप्ती जातीच्या डासाच्या चाचण्यामुळे हा रोग पसरतो. हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. एडिस ईजीप्ती डासाच्या पायावर तसेच पाठीवर पांढरे पट्टे असल्यामुळे तो इतर डासांपेक्षा वेगळा दिसतो. संसर्गित एडिस ईजीप्ती मादी डासाच्या चावण्यामुळे हा रोग पसरतो. भरपूर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, डोळ्यांच्या खोबण्या दुखणे, गंभीर आजारात नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. लहान मुले, गरोदर स्त्रिया हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. हिवताप (मलेरिया) हा रोग डासामार्फत पसरणाऱ्या परजीवीमुळे होतो. वाढते शहरीकरण व नागरिकीकरण हा रोग पसरविण्यास करणीभूत ठरतात. पावसाळा ऋतूमध्ये हा रोग जास्त आढळतो. संसर्गित ॲनॉफिलीस डासांच्या मादीमार्फत हा रोग पसरतो. खूप हुडहूडी भरून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा, यकृताला व प्लीहाला सूज येणे, मेंदूला दाह होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. गरोदर स्त्रिया, वृध्द व्यक्ती, बांधकाम करणारे मजूर हे या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. डासांव्दारे पसरणाऱ्या आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी हे करा - आपल्या परिसरात घराभोवती पाणी साठू देऊ नका. साठलेल्या पाण्यावरती थोडेसे रॉकेल टाका त्यामुळे डासांच्या अळ्या नष्ट होतील. घराच्या आजूबाजूला डबकी असतील तर त्यात गप्पी मासे सोडा. दर आठवड्याला एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करा. डास घरात शिरू नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या लावा. हात पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा. डासांचा उपद्रव होत असेल तर डास पळवून लावणाऱ्या किटकनाशकांचा वापर करावा. आपल्या भागात किटक नाशकांची फवारणी होत असल्यास पथकाला सहकार्य करा. झोपताना मच्छरदानी वापरा. घराभोवती फुटके डब्बे, वापरलेले जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचू देऊ नका. घरातील हौद, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी नियमित स्वच्छ करा. छतावरील वेंट पाईपला जाळी लावा. आठवड्यांतून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. नेहमीची पाणी साठवण्याची भांडी एक दिवस कोरडी ठेवावीत. हे टाळा - उघड्यावर झोपणे टाळा. घराभोवती डबकी साचू देऊ नका. पाण्याचा साठा जास्त ठेवू नका. घराभोवती कचरा साठू देऊ नका. डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ देवू नका. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो म्हणून नजीकच्या दवाखान्यात त्वरीत रक्त तपासणी करून घ्या. चिकनगुनिया हा रोग एडिस ईजीप्ती हा डास चावल्यामुळे होतो. हा देखील विषाणूमुळे होणारा आजार आहे. संसर्गित एडिस ईजीप्ती मादी डासांच्या चावल्यामुळे हा रोग पसरतो. ताप येणे, सांधेदुखी, पुरळ येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. लहान मुले व गरोदर स्त्रिया हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. स्वाईन फ्ल्यू हा विषाणूमुळे ( एच १ एन १ इन्फलुएन्झामुळे) होणारा आजार आहे. याचा संसर्ग स्वाईन फ्ल्यू बाधित एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. रूग्णांच्या शिंकण्यातून व खोकण्यातून हे विषाणू हवेव्दारा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, क्वचित प्रसंगी अतिसार, उलट्या होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. स्वाईन फ्ल्यू विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि हाफकिन संस्था मुंबई येथे करण्यात येते. खबरदारीचे उपाय - हात सातत्याने साबण व स्वच्छ पाण्याने धुवावे. पौष्टिक आहार घ्यावा. लिंबु, आवळा, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी विटामिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरावा. भरपूर पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी. स्वाईन फ्ल्यू रूग्णांपासून किमान 6 फूट दूर रहावे. लक्षणे दिसताच 36 तासांच्या आत उपचार सुरू करावेत. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा