शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

सायबर गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी अधिक सतर्क आणि दक्ष राहणे गरजेचे -सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष

महिला सुरक्षा विषयक कार्यशाळा संपन्न

    सांगली, दि. 2, (जि. मा. का.) :  सायबर गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण समाजानेच विशेषत: महिलांनी अधिक सतर्क आणि दक्ष राहणे गरजेचे असून यासाठी समाज माध्यमांबाबत जाणीवजागृती वाढविणे गरजेचे असल्याचे मत सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष यांनी आज येथे बोलतांना केले.
     जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी आत्मा सभागृहात आयोजित केलेल्या महिला सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेस सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, ॲड. रूपाली मेटकरी, निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती सहाय्यक एकनाथ पवार आदि उपस्थित होते.
     दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा, असे आवाहन करून सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, समाजमाध्यमांविषयी तांत्रिक ज्ञान वाढविणे गरजेचे असून यासाठी संपूर्ण समाजात सायबर साक्षरता आणि प्रबोधनाची नवी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यामध्ये महिला बळी पडणार नाहीत या दृष्टीने समाजमाध्यमांविषयी अधिक माहिती करून घेणेही गरजेचे आहे. 
     सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असून समाजात प्रत्येक घटकाने डोके शांत ठेवून, डोळे उघडे ठेवून समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहनही  सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष यांनी केले.
     या प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे म्हणाले, महिलांची कसल्याही प्रकारे फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही यासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा. समाजात दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहेच तथापी, सायबर गुन्हे घडणारच नाहीत यासाठी या माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करणे काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्ह्यांविषयी समाजाने विशेषत: महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती उदाहरणासह दिली.
     या प्रसंगी बोलताना ॲड. रूपाली मेटकरी यांनी महिला सुरक्षा विषयक अनेक कायद्यांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, हुंडाबळी, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अशा सर्वच कायद्यांची सोप्या पध्दतीने माहिती दिली.
     जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि महिलांविषयी असणारे कायदे तसेच योजनांची माहिती दिली. निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी आभार मानले.
     या प्रसंगी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुरू केलेल्या सखी मदत केंद्राविषयी माहिती देण्यात आली. महिला सुरक्षा विषयक योजना व कायद्यांविषयी प्रश्नोत्तरेही घेण्यात आली.
     या कार्यशाळेस वृत्तपत्र व प्रसार माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी, सखी मदत केंद्राच्या महिला, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000


   
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा