रविवार, २६ जानेवारी, २०२०

शिवभोजन योजनेचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते जिल्ह्यात शुभारंभ

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शिवभोजन योजना महाराष्ट्रात प्रायोगीक तत्वावर सुरू झालेली आहे. सांगली शहरात 3 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 150 संख्येच्या मर्यादेत लोकांना 10 रूपयांमध्ये जेवण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कोणीही भुकेल्या पोटी राहू नये, गरीबातल्या गरीबाची अन्नाची भ्रांत मिटावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना राज्यात अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 
सांगली  एसटी स्टॅण्ड परिसरातील उपहारगृहामध्ये सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेतील केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि उपस्थित होते.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली शहरात एसटी स्टॅण्ड परिसर उपहारगृह, मार्केट यार्ड व सांगली सिव्हील हॉस्पीटल परिसरातील शिंत्रे हॉस्पीटलच्या खाली शिवभोजन योजनेतील केंद्र आज सुरू करण्यात आले आहे. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
ठाकरे साहेबांना पुण्याई लाभू दे
आज या केंद्रावर जेवण केलेल्या समडोळी येथील कष्टकरी महिला सुशिला लोंढे यांनी १० रूपयांत चांगलं जेवण मिळालं. भाजी, आमटी, चपाती, भात सगळं व्यवस्थित मिळालं. ठाकरे साहेबांना पुण्याई लाभू दे असा शुभार्शिवाद दिला.
तर कसबे डिग्रजच्या ८४ वर्षीय कृष्णा बळवंत आपटे यांनी आपण कामानिमित्त या ठिकाणी आलो असून या ठिकाणी चांगली सोय झाली. जेवण चांगले होते, भरपूर होते, मी यावर समाधानी आहे असे सांगून ज्येष्ठ लोकांची चांगली सोय झाल्याचे मत व्यक्त केले.
00000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा