शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा - खासदार संजय पाटील

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : प्रत्येक जीव अनमोल आहे. मात्र, रस्ते अपघातात विविध कारणांनी अनेकांचे जीव जातात. ओव्हर स्पीड, मोबाईलवर बोलणे, ट्रॅक्टर ट्रॉलीला परावर्तक नसणे अशा अनेक कारणांनी रस्ते अपघात होतात. जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाली आहे. ही बाब आशावादी असली तरी, यापुढील काळात अपघात रोखण्यासाठी, रस्ता सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असा सूचना खासदार संजय पाटील यांनी दिल्या.
    जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा उहापोह करण्यात आला. बैठकीस आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एम. एस. मगदुम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
    खासदार संजय पाटील म्हणाले, अपघात होऊ नयेत, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेंनी आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. वेगमर्यादेवर नियंत्रण, स्पीड ब्रेकर, ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. स्कूल व्हॅनमध्ये प्रमाणित केलेलेच सीएनजी किट असावे. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये. असे कोणी करत असल्यास परिवहन विभागाने त्याची तपासणी करूत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. नागरिकांना रस्त्यावरील खड्‌ड्यामुळे कोणताही त्रास होणार नाही जाण्यायेण्यासाठी सुलभता व्हावी या दृष्टीने संबंधित यंत्रणेने रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून घ्यावेत. महामार्गांची कामे संबंधितांनी विहीत वेळेत पूर्ण करावीत. काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित विभागांनी रस्ता सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करावी. महामार्गाचे काम विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्या सोडवाव्यात असे सांगितले.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, जिल्ह्यात 36 ब्लॅक स्पॉट आहेत. त्यावर सूचविलेल्या उपाययोजनाप्रमाणे सदरची कामे संबंधित विभागाने तात्काळ पूर्ण करावीत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रीक खांबामुळे बरेच अपघात होत आहेत. यासाठी महावितरणने आवश्यक ती कार्यवाही करावी. सांगली शहरात रस्ते वाहतुक सुरळित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सिग्नल लावण्याबरोबरच महापालिकेने आवश्यक त्या ठिकाणी प्लॅस्टिक बॅरिकेटस लावावेत अशा सूचना केल्या.
रस्ते अपघातांची आणि मृतांची संख्या कमी करणे या मूळ उद्देशांच्या अनुषंगाने बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई, गरजेच्या ठिकाणी गतिरोधक, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉल्या, बैलगाड्या परावर्तक, सिग्नल यंत्रणा, आवश्यक ठिकाणी रस्ता रूंदीकरण, रस्ता दुभाजक आदि बाबींवर बैठकीत चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा