बुधवार, ८ जानेवारी, २०२०

'जागर जाणीवांचा' च्या माध्यमातून पूरबाधितांसाठी मानसिक आरोग्य सेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त क्षेत्रातील लोकांना मानसिक आरोग्य सेवा मनोसामाजिक प्रथमोपचार यासाठी जागर जाणीवांचा - उमेद नव्या आयुष्याची हा मानसिक आरोग्य प्रबोधन, प्रथोमपचार मनोबल हेल्पलाईन प्रकल्प  राबविण्यात येत आहे. यातून पूरबाधीत क्षेत्रात आपत्तीपश्चात जीवनमान उंचावण्यासाठी, मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूरग्रस्त पूरबाधित लोकांना आपत्तीपश्चात मनोसामाजिक आधार सेवा पुरविणे, लोकांना आपत्तीपश्चात मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी समुपदेशन सेवा देणे, लोकांना आपत्तीपश्चात निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांबाबत जाणीव जागृती करणे संदर्भ सेवांची माहिती पुरविणे, आपत्तीपश्चात भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी मोबाईल हेल्पलाईन कार्यान्वित करणे, आपत्तीपश्चात संभाव्य मानसिक ताणतणावाला सामोरे जाण्यासाठी मानसिक सक्षमता वाढविणे, आपत्तीपश्चात जीवनमान उंचावण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील कुटुंबांचे मानसिक आरोग्य विषयक प्रबोधन, समुपदेशन, मानसशास्त्रीय हेल्पलाईन मनोसामाजिक प्रथमोपचार देण्यासाठी मे. शुश्रुषा सल्ला मार्गदर्शन प्रशिक्षण संस्था इस्लामपूर या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
    या प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य प्रचार, प्रसार, प्रसिध्दी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पूरग्रस्त गावांमध्ये मानसिक आरोग्य पुनर्वसन याबाबत विविधांगी माध्यमाव्दारे योजनेचा प्रचार, प्रसार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मानसतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य, पोस्टर्स, दृकश्राव्य माध्यम, अनुभव कथन, प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन इत्यादी माध्यमांव्दारे उपचारात्मक प्रभावी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन, पूरग्रस्त गावांमध्ये पूरग्रस्त कुटुंबांना भेटी देणे आवश्यकता, मागणी नुसार गृहभेटी देवून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये सुसंवाद साधण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरू करण्यासाठी टोल फ्री नंबरची जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईनवर पूरग्रस्त भागातील आपत्तीपश्चात मानसिक स्वास्थ्यासंबंधी येणाऱ्या तक्रारीसंदर्भात समुपदेशन मनोसामाजिक प्रथमोपचार करण्याकरीता मानसतज्ज्ञ समुपदेशक जिल्हास्तरावरून कामकाज पाहतील. हा हेल्पलाईन प्रकल्प सुरू झाल्यापासून कमीत कमी 90 दिवसांकरीता कार्यान्वित राहणार आहे. हेल्पलाईन प्रतिसादानुसार मागणी केलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देणे, मानसिक, भावनिक आधार देण्यासाठी मैत्रीपूर्ण नात्याने कौटुंबिक सुसंवाद साधणे, मानसिक लक्षणाची तपासणी करणे, मनोसामाजिक प्रथमोपचारासाठी समुपदेशन करणे आवश्यकतेनुसार मनोविकार तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात येणार आहे. पूरग्रस्त कुटूंबातील मानसिक त्रासाची लक्षणे असणाऱ्या संदर्भित झालेल्या व्यक्तींची चिकित्सा करणे आनंददायी जीवनासाठी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा