शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

शेतकरी - उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तहसिल कार्यालय वाळवाच्या नुतन वास्तुचे थाटात उद्घाटन

- अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रयत्नशिल
- नियमित कर्जफेड करणाऱ्या तसेच दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी         सरकारचा दिलासादायक निर्णय लवकरच

    सांगली दि. 17  (जि.मा.का) :- अर्थव्यवस्था अडचणीत आली असताना ती बाहेर काढणे आवश्यक आहे, यासाठी शेतकरी - उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इस्लामपूर येथे दिली.
    वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयंत पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण)शंभूराजे देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक,  आमदार अनिल बाबर,आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
    महाराष्ट्राला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून शेवटच्या शेतकऱ्याला याचा लाभ पोहोचविणार .याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला तसेच दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार दिलासादायक निर्णय लवकरच घेईल.
    वाळवा तहसील कार्यालयाची नूतन इमारत अत्यंत देखणी आणि सुंदर असुन या इमारतीतून शेतकऱ्याला व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ही इमारत महाराष्ट्रात आपल्या कामाने लौकीकाची व कौतुकाची व्हावी, असेही ते यावेळी म्हणाले. देशातील अद्ययावत व सुसज्ज अशा या तहसील कार्यालयाच्या नुतन वास्तूतून इतिहास घडावा, सुलभ व पारदरर्शक काम या ठिकाणी व्हावे, येथे काम करणाऱ्या यंत्रणेने लोकांचे आशीर्वाद घ्यावेत, असा सल्लाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. महापुर व अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार यासाठीची मदत देतच आहे, याकामी केंद्र सरकारनेही मदतीची जोड द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
    वाळवा तालुकावासियांच्या सेवेसाठी आज अत्यंत सुंदर व भव्य अशी इमारत आज समर्पित होत आहे, याचा आनंद मला होत असून या इमारतीतून प्रशासन उत्तम चालावे, लोकांची कामे तात्काळ व्हावीत, सामान्य माणसासाठी याठिकाणी आश्वासक पोषक वातावरण निर्माण व्हावे, गावातील कामे गावातच व्हावीत, सरकारी कार्यालयांमधील गर्दी कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या इमारतीत बसणाऱ्या विविध यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पारदर्शीपणे व सुलभतेने लोकांची कामे करावीत. यावेळी वाळवा तालुक्याची क्रांतीकारकांची, समाजसेवकांची आणि साहित्यिकांची परंपरा व वारसा विषद करून महाराष्ट्राला उत्तमोत्तम देणग्या देण्याची तालुक्याची परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्याच्या तिजोरीत तूट असतांनाही नव्या सरकारने कर्जमाफीचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, याबरोबरच महाराष्ट्रात व देशात असणाऱ्या मंदीच्या वातावरणातून राज्याला बाहेर काढण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उद्योजकांनी अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात करावी,यासाठी विविधांगी प्रयत्न होत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुसज्ज अशा या इमारतीतून लोकांना जलद व विनम्र  तसेच लोकाभिमूख सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  यांनी स्वागत करुन  प्रास्ताविकात सांगितले की, वाळवा तालुक्यात 95 महसूली गावे तर 12 सर्कल आहेत. ब्रिटीश काळापासूनच्या तहसिल कार्यालयाच्या आवाराशी जोडलेल्या जनभावनांमुळे पुन्हा त्याच ठिकाणी तहसिल कार्यालय व्हावे अशी आग्रही मागणी जनतेतून होत होती.  त्यामुळे त्याच जागेवर तहसिल कार्यालयाची नवीन इमारत करण्यात आली. सदर इमारतीत तहसिल कार्यालयाबरोबरच नगरभूमापन व दुय्यम निबंधक अशी लोकांशी निगडीत अन्य कार्यालयेही आहेत. त्यामुळे विविध विभागांशी निगडीत कामे एकाच छताखाली होणार आहेत. तहसिल कार्यालयाच्या इमारतीतून महाराष्ट्र शासनाला अभिप्रेत लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू,
    या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, अधीक्षक  अभियंता संजय माने, सुरेंद्र काटकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. समारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. वाळवा तहसिल कार्यालयाच्या नुतन इमारत बांधकामाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी दिली. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्यावतीनेही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ही सुसज्ज वास्तु निर्माण करण्याऱ्या अभियत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. आभार प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी मानले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा