शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

कर्जमुक्ती योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची सर्व बँकांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : :  महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पुनरावलोकन/सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, आरबीआय चे एजीएम किशोर गोहिल, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, नाबार्डचे एजीएम लक्ष्मीकांत धानोरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी अनंत बेळगी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह विविध आर्थिक विकास महामंडळांचे अधिकारी, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न आवश्यक आहे. त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसेल अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधून अशी खाती तात्काळ आधार संलग्न करावीत. योजनेंतर्गत आवश्यक डाटा भरत असताना त्यामध्ये अचूकता असावी. कोणीही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन अपात्र खातेधारकांची नावे यादीत येणार नाहीत याबाबत सतर्कता बाळगावी. योजनेच्या अनुषंगाने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी संपर्क साधणार असल्याने बँकांच्या प्रत्येक शाखेत शेतकऱ्यांना विनासायास माहिती देण्यासाठी  हेल्प डेस्क (माहिती कक्ष) सुरू करावेत.
  यावेळी बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात अधिकाधिक रोजगार, स्वयंरोजगार निर्मिती व्हावी यासाठी योग्य लाभार्थी निवडून त्यांना विविध महामंडळामार्फत प्रशिक्षण द्यावे व प्रशिक्षित लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. आर्थिक साक्षरता मेळावे घेवून लोकांना मार्गदर्शन करावे. उद्योग, व्यवसायांसाठी, स्वयंरोजगारासाठी आलेल्या कर्ज मागणी प्रकरणांवर विहीत मुदतीत निर्णय घ्यावा व संबंधित अर्जदाराला त्याबाबत कळवावे. प्रकरणे नाकारण्याऐवजी त्रुटींची पूर्तता करून घेऊन वित्त पुरवठा करण्याचा दृष्टीकोन ठेवावा.
आमदार अनिल बाबर यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी बँकांनी शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे सांगून विविध महामंडळाच्या प्रतिनिधींनी तळागाळापर्यंत पोहचून त्यांच्याकडील योजनांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा. तसेच महामंडळांचे प्रतिनिधी, कर्ज प्रकरणांसाठी अर्ज करणारे अर्जदार व संबंधित बँका यांचे मेळावे घेऊन अर्जांची निर्गती लवकरात लवकर करावी असे सांगितले.
जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बँक प्रतिनिधींना दिली.
या बैठकीत सन 2019-20 अंतर्गत कृषि, लघु उद्योग क्षेत्र, अन्य प्राधान्य क्षेत्र यासाठी असणाऱ्या ७००० कोटींच्या वार्षिक आराखड्यातील उद्दिष्ट व पूर्ततेचा बँकनिहाय आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वितरणासाठी जिल्ह्याला या वर्षीचे २४१७ कोटींचे उद्दिष्ट असून डिसेंबर अखेर ११७४ कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये खरीपासाठी ७६ टक्के तर रब्बीसाठी १५ टक्के पीक कर्ज वितरीत झाल्याचे सांगण्यात आले.  बँकनिहाय कामकाजाचा आढावा घेऊन ज्या बँकांची कामगिरी समाधानाकारक नाही अशांची कामगिरी उंचवावी असे सक्त निर्देश देण्यात आले. यावेळी सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे यांच्याकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.


00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा