गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

शिराळा उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून कमी खर्चात उत्तम आरोग्य सेवा मिळावी - पालकमंत्री जयंत पाटील





सांगली, दि. 22, (जि. मा. का.) :  शिराळा उपजिल्हा रूग्णालयाची नुतन वास्तु शहराच्या वैभवात भर घालणारी असून या माध्यमातून कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
उपजिल्हा रूग्णालय शिराळा या नविन रूग्णालय वास्तुचा उद्घाटन समारंभ, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित कृषी प्रदर्शन, प्राथमिक आरोग्य केंद्र बिळाशीचे भुमीपूजन या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, पंचायत समितीच्या सभापती वैशाली माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हा रूग्णालय शिराळाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास रावळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपजिल्हा रूग्णालय शिराळा ही नुतन इमारत अत्यंत देखणी व अद्ययावत आहे. येथून शिराळा तालुक्यातील जनतेला चांगली सेवा मिळावी असे सांगून ही इमारत नेहमीच स्वच्छ व सुंदर ठेवा असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले. पंचायत समितीची इमारत, शिराळा बसस्थानकाची इमारत तसेच सद्याची उपजिल्हा रूग्णालयाची नवीन वास्तु आदिंच्या एकापेक्षा एक इमारतींच्या सुरेख उभारणीत आमदार मानसिंगराव नाईक यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी अधोरखीत केले.
जलसिंचन खाते सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असून वाकुर्डे बुद्रुक योजना तात्काळ पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही देवून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनीही सामान्य माणसांच्या बाबतीत संवेदनशील राहून जनतेला पारदर्शी सेवा द्यावी. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शिराळा, वाळवा तालुक्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील लोकांचे रेशनकार्डासाठी हेलपाटे वाचविण्यासाठीही विशेष प्रयत्न चालू आहेत. तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी विविध खात्यातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे असे सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही सन्मानीत करण्याचा शासनाचा मानस असून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनात्मक निधी देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
उपजिल्हा रूग्णालय शिराळा ची १४ कोटी ६९ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेली नुतन वास्तु शहराच्या वैभवात भर घालणारी असल्याचे सांगून सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे म्हणाले, हे उपजिल्हा रूग्णालय शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्ता आधारीत सेवा देईल. यासाठी पूर्ण क्षमतेने चालावे म्हणून आवश्यक ती सर्व पदे मंजूर करून त्यासाठी अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील. या भागाची गरज लक्षात घेऊन डायलेसीस युनिट व त्यासाठी आवश्यक पदे ही निर्माण केली जातील. आरोग्य वर्धीनी योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवेचे राज्यभरात बळकटीकरण करण्यात येणार आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्तीही वाढविण्यात येणार आहे. तसेच १०८ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी सद्या लागणारा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालय वाळवा हे ५० खाटांवरून १०० खाटांचे करण्यासाठीही सकारात्मक असल्याचे सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी सामान्य माणसांना गुणवत्तापूर्ण सेवा या रूग्णालयाच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून वाकुर्डे बुद्रुक योजना व अन्य विकास कामांनी गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा तालुका विकास कामांमध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगून शिराळा उपजिल्हा रूग्णालयासाठी आवश्यक पद निर्मिती व्हावी, ५० खाटांवरून हे रूग्णालय १०० खाटांचे व्हावे, डायलेसिस केंद्र सुरू व्हावे, वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामांना गती द्यावी असे आग्रही प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात उपजिल्हा रूग्णालयाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा