शनिवार, ४ जानेवारी, २०२०

महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

महिला आयोग तुमच्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद
                
    सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : महिलांना देण्यात येणारे दुय्यम स्थान हेच महिलांवरील अत्याचाराला कारण ठरत आहे असे सांगून महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे. महिलांनी जीवनातील समस्या, अत्याचार यामुळे निराश व हतबल न होता महिला आयोगाची मदत घ्यावी. राज्य महिला आयोग अन्याय, अत्याचार पिडीत महिलांच्या जखमांवर मातेच्या ममतेने फुंकर घालण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सखी वन स्टॉप सेंटर, सांगली  येथे घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती विश्वास माने, एमएसईबीच्या संचालिका निता केळकर, उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, विधी अधिकारी डी. पी. बोराडे,  जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांना सन्मान मिळवून देणे, स्त्री, पुरूष समानतेचे मुल्य रूजविणे, पिडीत, शोषित महिलांना न्याय मिळवून देणे, महिलांच्या संदर्भातील संरक्षक कायद्यांबद्दल जाणीवजागृती करण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून करण्यात येत असल्याचे सांगून ॲड. विजया रहाटकर म्हणाल्या, जीवनात येणाऱ्या समस्यामुळे निराश होवू नका. तसेच अन्याय, अत्याचार सहन करू नका, कोणताही प्रसंग तुमच्यावर ओढवल्यास तुम्हाला तातडीचा निवारा, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, पोलीस सहाय्य यासाठी शासनाने सखी मदत केंद्र (वन स्टॉप सेंटर) सुरू केले आहे. महिलांनी त्वरीत मदतीसाठी १८१ या सीएम हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल.
अत्याचारग्रस्त महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोगाव्दारे होत असल्याचे ॲड. विजया रहाटकर यांनी सांगितले.
    महिला आयोग तुमच्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे ७० प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
    जनसुनावणीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाने डिजीटल साक्षरता हा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून महिलांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे डिजीटल ज्ञान देण्यासाठी ५०० संस्थांच्या माध्यमातून राज्यभरात १ लाख महिलांना डिजीटल साक्षर करण्यात येत आहे. याला ग्रामीण भागात महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वीच्या तुलनेत आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी महिला आता पुढे येत असून कायद्याबद्दल जाणीवजागृती वाढत आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून कायद्यांबाबत जाणीवजागृतीवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.
प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले. आभार     जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे यांनी मानले.
या कार्यक्रमास न्यायालयीन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सुनावणीसाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
000000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा