शुक्रवार, ८ जुलै, २०२२

कोविड-19 लसीचा दुसरा व प्रिकॉशन डोस तातडीने घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- कोविड-19 लसीकरण मोहिमेत सांगली जिल्हा राज्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरणात दुसऱ्या तर 15 ते 18 वयोगटात तिसऱ्या क्रमांकावर सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ज्या पात्र नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेणे अद्याप बाकी आहे, त्यांनी तो तात्काळ घ्यावा. तसेच ज्यांनी प्रिकॉशन डोस विहीत कालावधी पूर्ण होवूनही घेतलेला नाही त्यांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तो तात्काळ घ्यावा. यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा अधिक गतीमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 लसीककरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आरोग्य उपसंचालक डॉ. राम हंकारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, महानगरपालिकेचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, उपजिल्हा रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 लसीकरण मोहिमेत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणात 66.46 टक्के इतके लसीकरण करून सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 15 ते 18 वयोगटात 65.66 टक्के लसीकरण करून सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पहिला डोस 23 लाख 33 हजार 241 जणांनी तर दुसरा डोस 21 लाख 15 हजार 290 जणांनी घेतला आहे. तसेच प्रिकॉशन डोस 87 हजार 721 जणांनी घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्याला 43 लाख 05 हजार 660 डोसेस प्राप्त झाले असून आजअखेर 1 लाख 16 हजार 930 डोसेस शिल्लक आहेत. जिल्ह्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असून ज्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर हर घर दस्तक मोहिमेची गतीमानपणे अंमलबजावणी करून उर्वरीत लोकांना तातडीने डोस देण्यात द्यावेत. जिल्ह्यामध्ये कमी लसीकरण झालेल्या तालुका व गावे यामध्ये लसीकरणाची मोहिम गतीमान करावी. याबरोबरच जिल्ह्यामध्ये खाजगी नोंदणीकृत लसीकरण केंद्रावरही लसींची उपलब्धता करून देण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे त्यांची माहिती ऑनलाईन तातडीने भरावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू झाला असून अतिसार वाढण्याचा धोका संभवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. यामध्ये ओआरएस चे वाटप व घरगुती उपायांची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यावी. जिल्ह्यामधील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी साठ्यांचे क्लोरिनेशन करण्यात यावे. त्याचबरोबर जनतेनेही पाणी उकळून प्यावे. हात स्वच्छ धुवावेत त्याचबरोबर वैयक्तिक व परिसराचीही स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा