शुक्रवार, १ जुलै, २०२२

कृषि दिन उत्साहात साजरा

कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै 2022 जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये दि. 25 जुन ते 01 जुलै 2022 दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप करण्यात आला. सांगली येथे आत्मा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तंत्र अधिकारी मयुरा काळे, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसह इतर शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी उपस्थितांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनां विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रचार प्रसिद्धीसाठी रिसोर्स शेतकरी म्हणून सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव गणपतराव माने यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. पडवळवाडी येथील कृषिभुषण सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सचिन तानाजी येवले यांनी सेंद्रीय शेती पद्धती व विक्री व्यवस्थापन याबाबतउपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कृषि दिनाचे औचित्य साधून उपस्थित अधिकारी व विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्याहस्ते कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका कुपवाड येथील कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक तंत्र अधिकारी मयुरा काळे यांनी केले, आभार कृषि उपसंचालक प्रियांका भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश ज्ञानदेव चव्हाण (वसंतराव नाईक कृषिभूषण), सुनिल आनंदराव माने (वसंतराव नाईक कृषिभूषण), प्रशांत श्रीधर लटपटे (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार), काकासाहेब रावसाहेब सावंत (उद्यानपंडीत पुरस्कार) तसेच कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी व मिरज तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा