गुरुवार, ७ जुलै, २०२२

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योग सुरु करण्यासाठी 25 ते 50 लाखापर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय आहे. चालु वित्तीय वर्षामध्ये सांगली जिल्ह्याकरीता 870 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ठ शासना मार्फत देण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 18 ते 45 वयोगटातील किमान सातवी पास इच्छुकांना 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे 18 ते 45 वयोगटातील किमान दहावी पास इच्छुकांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग व माजी सैनिक या प्रवर्गातील व्यक्तींना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे सवलत देण्यात आलेली आहे. या योजनेची दोन यंत्रणामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामीण भागांसाठ महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ या यंत्रणा कार्यरत आहेत. या योजना पुर्णपणे ऑनलाईन असून maha-cmegp.gov.in या पोर्टलवर अर्ज सादर करावयाचा आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी घटकांना 15 टक्के ते 35 टक्यापर्यंत अनुदानाची सोय करण्यात आली असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा