मंगळवार, २६ जुलै, २०२२

आपली वसुंधरा वाचविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेवून प्रदुषण मुक्तीसाठी खारीचा वाटा उचलावा -प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही जगातील गंभीर समस्या आहे. जगामधील अनेक देश प्रदुषणामुळे ओसाड होत आहेत. त्यामुळे प्रदुषणावर नियंत्रण आणून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरण प्रदुषण मुक्त पर्यावरण उपलब्ध करुन देणे आता ही सर्वात मोठी काळाची गरज आहे. आपली वसुंधरा वाचविण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेवून प्रदुषण मुक्तीसाठीचा खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांनी केले. जिल्हा न्यायालय विजयनगर, सांगली येथील हॉलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ व सांगली बार असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणातील प्रदुषणाचा मानवी हक्कावर होणारा ऱ्हास रोखण्यासाठी व कमी करण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख सांगली बार असोसिएशनचे प्रशांत जाधव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, न्यायाधीश, वकील, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर पुढे म्हणाले, शासनाने प्रत्येक क्षेत्राच्या नियंत्रणासाठी विविध व्यवस्था निर्माण केल्या आहेत. त्या-त्या यंत्रणा त्यांची कामे करीत आहेत. त्यामध्ये प्रदुषण नियंत्रणासाठीही काम होत आहे. पण या यंत्रणाखेरीज समाजातील प्रत्येक नागरीकांचा आपले कर्त्यव्य समजून प्रदुषण कमी करण्यासाठी सहभाग आवश्यक आहे. पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचा अतिवापर हा सुध्दा प्रदुषणाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बचत करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रामुख्याने प्रत्येकाने पाणी, वीज, मानवी जिवनासाठी आवश्यक उपकरणे याचा वापर मर्यादीत ठेवून प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यावेळी म्हणाले, पर्यावरणाचे होणारे प्रदुषण येणाऱ्या काळासाठी फार मोठी समस्या ठरत आहे. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना शुध्द पर्यावरण देणे आपली जबाबदारी आहे. प्रगती करणे ही आवश्यक बाब असली तरी पर्यावरणाचा समतोल राखून ती प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक सुजान नागरिकांनी नियमांचे, कायद्याचे पालन करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वातावरणीय बदल झपाट्याने होत आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्याक ऱ्हासामुळे आजच्या परिस्थितीत महापूर, चक्री वादळे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या टाळावयाच्या असतील तर प्रदुषण कमी करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनिस यावेळी म्हणाले, जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून दिल्लीचा समावेश आहे. ही बाब येणाऱ्या पिढ्यासाठी घातक असून वेळेतच सावधान होणे ही काळाची गरज आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक नवनविन समस्या उद्भवत आहेत. प्रदुषणामध्ये प्रामुख्याने जल, वायू, ध्वनी, माती यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. हे पर्यावरणासाठी बाधक आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढे येणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे हे महत्वाचे आहे. शासनस्तरावर प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असून यामध्ये माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण अभियान याचा समावेश आहे. सांगली-मिरज,कुपवाड शहर महापालिकेच्यावतीनेही प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून माझी वसुंधरा या अभियानात अतिउकृष्ठ काम करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकविला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी व्दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. फारुख कोतवाल यांनी केले. आभार जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय मेहंदळे यांनी केले. यावेळी पर्यावरणासंबंधीचे कायदे या विषयावर ॲड. ओंकार वांगीकर, पर्यावरण संबंधीच्या कायद्याची व राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण बोर्डाची भूमिका या विषयावर ॲड. दत्तात्रय देवळे, प्रदुषण नियंत्रण बोर्डाची माहिती व त्यांची कार्यपध्दती या विषयावर नवनाथ अवताडे यांचे मार्गदर्शन माहितीचे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा