मंगळवार, १२ जुलै, २०२२

औद्योगिक वसाहतीमध्ये ग्रीन स्पेससाठी राखीव भूखंड वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्या वापरात नसलेले मोकळे भूखंड ताब्यात घेवून मागणीनुसार उपलब्ध करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण कमी व्हावे यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून औद्योगिक वसाहती हिरव्यागार करण्यासाठी उद्योग कार्यालयाने ग्रीन स्पेससाठी राखीव भूखंड तातडीने उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन करण्यासाठी पाण्याची उपलब्धतता करून द्यावी. या वृक्षारोपण मोहिमेत औद्योगिक संघटनांनी सहभाग घ्यावा. तसेच उद्योगासाठी देण्यात आलेले भूखंड जर वापरात नसतील किंवा त्याच्यावर कोणत्याही कारखान्याची उभारणी केली नसेल असे मोकळे भूखंड कोणते आहेत याचे सर्व्हेक्षण करून ते ताब्यात घ्यावेत व मागणीनुसार ते उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र सभा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, व्यवस्थापक एन. एम. खांडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच उप प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. आ. गांधीले, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आदि उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ होत असून औद्योगिक क्षेत्र वसविण्यासाठी उद्योजकांकडून जागेची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग विभागाने जिल्ह्यामध्ये नविन औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी जागेची पाहणी करावी व स्थळ निश्चिती करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करावा, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीत एमएसईबी चे सबस्टेशन उभारण्यासाठी जागेची उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर सीईटिपी प्लँट तात्काळ सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी. औद्योगिक क्षेत्रांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने काम करावे. औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, आवश्यक असणाऱ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तातडीने तयार करावेत. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत अशा ठिकाणची टपऱ्या, खोकी काढावी. कामगारांसाठी ईएसआयसी रूग्णालयासाठी भूखंड देण्याबाबत शासनास प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात पाण्याची पाईपलाईन, रस्त्यांचे पॅच वर्क तातडीने करण्यात यावेत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. मिरज एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनस सुरू करण्याबाबतही तपासणी करावी. त्याचप्रमाणे देशिंग औद्योगिक कार्यक्षेत्रात विद्युत पुरवठा नियमित करण्याबाबत एमएसईबी ने तातडीची बैठक आयोजित करून संबंधित उद्योग क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घ्यावेत व त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा