बुधवार, २७ जुलै, २०२२

दंड सवलत अभय योजनेचा लाभ घ्या - मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव

शासकीय सुट्टीच्या दिवशी दि. ३० व ३१ जुलै रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरू राहणार सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाने ज्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्क वसुली प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क रकमेवर देय असणाऱ्या दंडाबाबत "दंड सवलत अभय योजना सन 2022" जनहितार्थ जाहीर केलेली आहे. ही योजना दि. 01 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 आणि दि. 01 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 अशा एकूण दोन टप्प्यामध्ये लागू केलेली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. या अनुषंगाने 90 टक्के दंड सवलतीचा या योजनेचा पहिला टप्पा दि. 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तथापि शनिवार दि. 30 जुलै 2022 आणि रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी शासकिय सुट्टी असल्याने तसेच रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी बँका बंद असल्याने पक्षकारांना दंडाची रक्कम शासन जमा करण्याबाबत अडचणी येवू शकतात. यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. 26 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये आदेशित केल्याप्रमाणे दंड सवलत अभय योजना सन 2022 च्या 90 टक्के सवलतीचा पहिल्या टप्प्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला होण्यासाठी शनिवार दि. 30 जुलै 2022 आणि रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय राजवाडा आवार सांगली हे कार्यालय नियमित वेळेत सुरू राहणार असून देय दंड रकमेची चलने ऑनलाईन पध्दतीने शासन जमा करण्याची सुविधा राजवाडा आवार सांगली येथे करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय राजवाडा कंपौंड सांगली, दुरध्वनी क्रमांक-0233-2376136, ई-मेल आय डी-jdrsangli01@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा