गुरुवार, २८ जुलै, २०२२

नागपंचमी सणाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : शिराळा येथील नागपंचमी यात्रा दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते. नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत रहावी तसेच गर्दीत वाहन घूसून नागरीकांच्या जीवीतास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम 34 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात दि. 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या 01.00 वाजल्यापासून ते 24.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे बदल केला आहे. पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात केलेला बदल पुढीलप्रमाणे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी-कार्वे-ढगेवाडी फाटा-ऐतवडे बुद्रुक फाटा-लाडेगाव-वशी-येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र. ४ कडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 131 प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा