मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम : दुभंगलेले ओठ, टाळूवर शस्त्रक्रियेसाठी 30 बालकांना घेऊन बस अकोल्याला रवाना

सांगली, दि. 11, (जि.मा.का.) : सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजारांवर शस्त्रक्रियेकरिता 30 बालकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वतंत्र बस अकोल्याला रवाना झाली.
यावेळी या बालकांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. शहनवाज नाईकवडे, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह बालके त्यांचे पालक उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 58 बालकांकरिता दिनांक 14 ऑगस्ट 2018 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर घेण्यात आले होते. तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र शारीरिकदृष्ट्‌या तंदुरूस्त असणाऱ्या या 30 बालकांवर श्रीराम हॉस्पिटल, अकोला येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल रोटरी क्लबच्या सहकार्याने आणि अद्ययावत, गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा अकोल्याला पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. ही बालके त्यांच्या पालकांचा पूर्ण प्रवास, शिबीरादरम्यानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
या शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसल्याने प्रति शस्त्रक्रिया अंदाजित 1 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित असतो. त्यामुळे इतर योजनांमध्ये अशा गरजू जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील तसेच मिरज, शिराळा, तासगाव, कडेगाव, इस्लामपूर येथील लाभार्थ्यांना या अतिखर्चिक शस्त्रक्रियांचा मोफत लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येते. वैद्यकीय अधिकारी, महिला पुरूष, औषधनिर्माता परिचारिका अशा 4 जणांच्या पथकामार्फत बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील 790 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया तर 5 हजार 800 बालकांवर इतर शस्त्रक्रिया आजअखेर पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. मागील तीन वर्षांमध्ये हृदय शस्त्रक्रिया इतर शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या संख्येमध्ये सांगली जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून सन 2017-18 मध्ये हृदय शस्त्रक्रियेमध्ये प्रथम तर इतर शस्त्रक्रियेमध्ये व्दितीय क्रमांकावर आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा