शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

लोकराज्य मासिक महाराष्ट्र शासनाचे दर्पण - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

देशात सर्वप्रथम येण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची ग्वाही
जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकराज्य वाचक अभियानाचा उत्साहात शुभारंभ

   सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : लोकराज्य मासिकाला मोठी परंपरा असून, महाराष्ट्र शासनाचे ते दर्पण आहे.  समाजातील चांगले काम आणि शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारा हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य घरोघरी पोहोचवून खप वाचक संख्येच्या बाबतीतही देशात प्रथम क्रमांकावर यावे, यासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली..
जिल्हा माहिती कार्यालय आणि भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आय.एम.आर.डी.ए.चे संचालक डॉ. नितीन नायक, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, 'लोकराज्य' मासिकामध्ये शासनाचे निर्णय, विकास योजना, चांगल्या कल्पना यासह उपयुक्त माहिती दिली जाते. सध्या लोकराज्य हे राज्यातील पहिल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे नियतकालिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुसार हे मासिक देशभरात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आवश्यक ते योगदान सर्वतोपरी देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, वैचारिकता आणि त्याला भावनेची जोड देणे आवश्यक आहे. कुठलीही लढाई ही आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकली जाते. ध्येय साध्य करण्यासाठी ज्ञान, कष्ट, आत्मविश्वास आणि श्रद्धा या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. नकारात्मक विचारांचा त्याग करून कोणतीही गोष्ट मनापासून केली की यश साध्य होतेच. माणसामध्ये खूप सामर्थ्य, ऊर्जा आहे. ही ऊर्जा शक्तीमध्ये परावर्तीत करा. स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः घडवा.
कायद्याच्या विद्यार्थ्यांनी माणूस ओळखायला शिकणे आवश्यक आहे. बुद्धिमत्ता, सद्सद्विवेकबुद्धी आणि कायदा या तिन्ही बाबींचे मिश्रण करतानाच माणूस म्हणून प्रामाणिक राहा आणि माणुसकीने वागा, सामाजिक बांधिलकी जपा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. नितीन नायक यांनी लोकराज्य मासिक आणि युवा माहिती दूत या उपक्रमांमधून शासकीय योजना घरोघरी पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमाचा हेतू विषद करताना वर्षा पाटोळे म्हणाल्या, लोकराज्य घरोघरी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकराज्य वाचक अभियानांतर्गत सप्टेंबर महिन्यात सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी असे लोकराज्य वाचक अभियान घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आदि कार्यक्रम घेतले जाणार आहेत. डॉ. पूजा नरवाडकर यांनी प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी देशना शहा आणि कोमल गावडे या  लोकराज्य वाचक विद्यार्थिनींनी लोकराज्य मासिकाबाबत मनोगत व्यक्त करून, विविध विशेषांकांचा आढावा घेतला. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते अनिरूध्द कारंजकर, सुप्रभा महाजन, स्वालेहा उगरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रध्दा पाटील आणि ऋषिकेश देसाई यांनी केले. आभार ओंकार चौगुले यांनी मानले.
लोकराज्य कॅनोपी ठरली आकर्षणाचे केंद्र
    माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लोकराज्य कॅनोपीचे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याहस्ते उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी या अनोख्या राज्यात प्रथमच कार्यान्वित झालेल्या संकल्पनेचे कौतुक करून, या कॅनोपीच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल तसेच लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली.
ही कॅनोपी लोकराज्य वाचक अभियानांतर्गत जिल्हातील विविध ठिकाणी लावण्यात येणार आहे. या माध्यमातून लोकराज्य मासिकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. ही कॅनोपी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. उद्घाटन होताच नागरिक विद्यार्थ्यांची गर्दी कॅनोपीजवळ झाली.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा