बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - मतदार यादी निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर

- मतदारयादीतील बदल, हरकती, सूचना, आक्षेपांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत.

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. नवमतदारांच्या नोंदणीसाठी सर्व राजकीय पक्षानीही भर द्यावा. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी जास्तीत जास्त बुथस्तरीय अभिकर्ता (बीएलए) लवकरात लवकर नेमावेत, मतदार याद्या परिपूर्ण करण्यासाठी त्यांची मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
मतदार यादी पुनरिक्षणाच्या  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त श्री. जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित केला असून त्यानुसार 31 ऑक्टोबर पर्यंत मतदारयादीमधील बदल, हरकती, सूचना, आक्षेप मागविण्यात आले आहेत असे सांगून मतदार यादी निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, मतदारांनी यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वयोगटातील 80 ते 85 हजार नवीन मतदारांची नोंदणी होणे आवश्यक होते. तथापी आत्तापर्यंत 10 हजार 691 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ही तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने विद्यापिठांना आवाहन केले आहे. 18 वर्षे पूर्ण झालेली कोणीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांमध्ये फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यात मतदार छायाचित्र ओळखपत्राचे 99 टक्के वितरण झाले आहे. हे प्रमाण अतिशय चांगले आहे. पण केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येणार नाही तर मतदानासाठी मतदारयादीत मतदाराचे नाव असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक भागात अधिकतम 1400 मतदारांचा निकष आहे. यानुसार जिल्ह्यात 3 मतदान केंद्रांची वाढ करण्यात आल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, पलूस - कडेगाव मतदारसंघात 1 तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात 2 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी नवीन नाव नोंदणीसाठी असणाऱ्या नमुना क्रमांक 6 मध्ये आलेले सर्व अर्ज करून त्यांची छाननी करून त्यावर केलेल्या कार्यवाहीचा गोषवारा तयार करावा. तसेच दुबार मतदार नोंदणी संदर्भात आलेल्या हरकतींचीही  तात्काळ दखल घ्यावी. स्थलांतरीत मतदारासंदर्भातही विहीत नमुन्यात प्रक्रिया व्हावी असे निर्देश दिले. कोणत्याही कारणामुळे मतदार वंचित राहू नये, मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी मतदारयादी निर्दोष करण्यासाठी सर्वोतोपरी दक्ष रहा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले,  1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणारे सर्व नागरिक मतदारयादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करु शकतील. मतदान केंद्रस्तीय अधिकाऱ्याकडे नमुना 6, नमुना 7, नमुना 8 नमुना 8अ चे अर्ज उपलब्ध होतील. तसेच ज्या मतदारांची मतदार यादीत छायाचित्रे नाहीत, अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे रंगीत छायाचित्र (फोटो) द्यावीत. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी सांगली, मिरज, कुपवाड या ठिकाणी दोन-दोन दिवसाचे कॅम्प लावण्यात येतील नमुना क्रमांक 6, 7, 8 भरून घेण्यात येतील विहीत प्रक्रियेनंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगून 18 ते 19 वर्षे वयोगटातील नवीन मतदारांची नोंदणी मोठ्या संख्येने व्हावी यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामधील प्राचार्यांना भेटून सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात 2402 मतदान केंद्रे असून एकूण मतदार नोंदणीमध्ये 12 हजार 850 ची वाढ झाली आहे तर 75 हजार 115 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच 63 हजार 927 मतदार नावांमध्ये दुरूस्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा