शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

नोकरी, व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्या सोलापूरकरांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची साद

सांंगली (जि.मा.का) 22 :: मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असणारे आणि कामानिमित्त, नोकरी, व्यवसायानिमित्त राज्यात आणि देशात आणि देशाबाहेर विखुरलेल्या सोलापूरकरांना एकत्र आणण्यासाठी सहकार, पणन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून सोलापूर सोशल फाऊंडेशन सुरू करण्यात आले आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे विविध क्षेत्रातील ब्रँडिंग करून जिल्ह्याचा सर्वच क्षेत्रात विकास करणे हा मूळ हेतू आहे. त्यामुळे मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या आणि आता नोकरी, व्यवसायानिमित्त सोलापूर जिल्ह्याबाहेर असणाऱ्या व्यक्तिंनी सोलापूर सोशल फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरचा विठूराय, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सोलापूरचे श्रीसिद्धरामेश्वर मंदिर अशी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच, सोलापुरी चादर, शेंगाची चटणी, माळढोक अभयारण्य अशी अनेक वैशिष्ट्ये सोलापूर जिल्ह्याची आहेत. सोलापूर जिल्हा संत सावता माळी, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत अशा अनेक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. यासह अनेक क्षेत्रात सोलापूरकरांचा ठसा उमटलेला आहे.
सोलापूरच्या या वैशिष्ट्यांचे ब्रँडिंग करून सोलापूरचा विकास करण्याचा विचार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मनात खूप दिवस होता. त्यातून सोलापूर सोशल फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली. या माध्यमातून मूळचे सोलापूर जिल्ह्यातील परंतु नोकरी व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, कलाकार, क्रीडापटू, यांना एकत्र आणणे, त्यातून विचारमंथन करणे आणि सोलापूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास साधणे, असा मानस आहे. त्यामुळे अशा सोलापूरकरांनी श्री. अमोल देशमुख, संपर्क क्र. 9960619594  वर संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा