शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत विकास साधण्याचे काम - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : शासन शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. सामान्य माणसाचे हित लक्षात घेवून शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंतचा विकास साधण्याचे काम शासन करीत आहे, असे प्रतिपादन कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
वाळवा तालुक्याील मालेवाडी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वितरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच मानसिंग पाटील, उपसरपंच जालिंदर जाधव, महादेव पाटील, सागर खोत, पांडुरंग जाधव, दत्तात्रय कोळेकर, मंगेश कोळेकर, रणजित खवरे आदि मान्यवर उपस्थित होते.
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शासन धोरणात्मक निर्णय घेवून अनेक योजना राबवित आहे. जलयुक्त शिवार अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, ठिबक अनुदान, भाजीपाला नियमन मुक्ती, गट शेतीला चालना देणे अशा अनेक कल्याणकारी योजना शासन राबवित आहे. लहान-लहान वाड्यावस्त्यांचाही विकास करण्याच्या दृष्टीकोनातून कोट्यावधी रूपयांचा निधी पेयजल पाणीपुरवठा योजना रस्ते कामासाठी दिला आहे. वाघवाडी फाटा, इस्लामपूर येथे मंजूर क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी 102 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आरोग्य योजनेंतर्गत गोरगरीबांना वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत एकही कुटूंब निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही. अशा अनेकविध कल्याणकारी योजना राबवून शासन विकासाला चालना देण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी मालेवाडी येथे 3 लाख रूपये किंमतीच्या पेव्हींग ब्लॉक बसविणे या कामाचे उद्घाटन तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थीना गॅस कनेक्शन वितरण कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागर खोत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामसेवक एस. एस. लतीफ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मालेवाडी पंचक्रोशीतल ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा