सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

स्पर्धा परीक्षार्थीना शासकीय योजनांच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी लोकराज्य महत्त्वाचा स्त्रोत - उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकेपणा, अचूकपणा आणि वस्तुनिष्ठता हवी. धावत्या युगात शासनाच्या विविध योजनांची वस्तुनिष्ठ माहिती लोकराज्य मासिक देते. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींनी लोकराज्य मासिकाचे वाचन करणे अनिवार्य आहेे, असे आग्रही मत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत  नाटेकर यांनी केले.
    जिल्हा माहिती कार्यालय आणि जय हिंद युथ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जय हिंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख सचिन रजपूत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी अमृत  नाटेकर म्हणाले, स्पर्धा परीक्षार्थीचे स्वतःचे संदर्भ आणि मुद्देलेखन असावे. यशप्राप्तीसाठी ज्ञानप्राप्तीसाठी संदर्भग्रंथ, त्यांचा सखोल अभ्यास  आणि प्रश्नांची नेमकी, अचूक उत्तरे तुमचे वेगळेपण दर्शवतात. त्यासाठी शासकीय प्रकाशनांचे वाचन महत्त्वाचे ठरते. शासकीय योजनांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह विश्वासार्ह माहिती महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून दिली जाते. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीने लोकराज्यचे वाचन अवश्य करावे.
स्वामी विवेकानंद यांच्या उठा, जागे व्हा आणि स्वयंसिद्ध होईपर्यंत थांबू नका, या उक्तीचा संदर्भ देत उपजिल्हाधिकारी अमृत  नाटेकर म्हणाले, स्पर्धा परीक्षा देताना अभ्यासाचे नियोजन आणि वेळेचा सदुपयोग करा. अभ्यास करताना स्वतःचे मुद्दे काढावेत. चांगल्या संगतीत वैचारिक देवाणघेवाण चांगली होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षार्थीकडे संयम हवा. ध्येय आणि साध्य यांची सांगड घाला, असे सांगतानाच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही दाखले दिले.  तसेच, स्पर्धा परीक्षार्थींसाठी आवश्यक मार्गदर्शन करत उपयुक्त टिप्स दिल्या.
प्रास्ताविकात सचिन रजपूत म्हणाले, लोकराज्य वाचक अभियान हा एक स्त्युत्य उपक्रम असून, या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचेल.
यावेळी श्रीधर चव्हाण आणि सैफ अली बागवान या लोकराज्य वाचक विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाबाबत मनोगत व्यक्त करून, विविध विशेषांकांचा आढावा त्याचे महत्त्व सांगितले. वर्षा पाटोळे यांनी लोकराज्य घरोघरी या मोहिमेबद्दलचा हेतू विषद केला. सूत्रसंचालन संप्रदा बीडकर यांनी केले. आभार आदित्य घोडके यांनी मानले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा