शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

ग्रामीण रूग्णालय गरीब रुग्णांसाठी जीवनदायी मंदिर ठरावे -पालकमंत्री सुभाष देशमुख माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून दुष्काळी, ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, गरीब रुग्णाला रूग्णालय जीवनदायी मंदिर वाटले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
माडग्याळ येथे बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे तसेच अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गडदे, डॉ. रवींद्र आरळी आदि मान्यवर उपस्थित होते.  
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, रुग्णाचा अर्धा आजार डॉक्टरच्या नीट बोलण्याने बरा होतो, त्यामुळे रुग्णांशी सकारात्मक संवाद साधा. त्यामुळे त्याला आजारावर मात करणे सोपे होईल. गरीब रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत उपचार मिळणार नाहीत, असे वाटता कामा नये, एवढ्या दर्जेदार आरोग्य सुविधा ग्रामीण भागात द्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत केली असून, गरजुनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार विलासराव जगताप म्हणाले, माडग्याळ मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी मोठा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या ग्रामीण रूग्णालयामुळे लाभ जनतेची सोय होणार आहे. ग्रामीण रूग्णालय आणि अधिकारी, कर्मचारी निवासस्थानासाठी प्रत्येकी जवळपास 3 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. जनतेच्या रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत गरजा पूर्ण करत आहोत. तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागून विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, प्रत्येक शेतकऱ्याला एक ट्रान्सफॉर्मर देण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा