गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत अपूर्ण कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा - पालकमंत्री सुभाष देशमुख


डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शिक्षण, बंधारे जलसिंचनाची कामे, रस्ते विकास, पाणीपुरवठ्याची कामे अन्य मूलभूत सुविधांची कामे केली जातात. या कामांसाठी सन 2017-18 मध्ये दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. अनुदान वितरण प्रणाली (बी. डी. एस.) प्रमाणे तो खर्चही झाला आहे. या निधीतून मंजूर 24 कामांपैकी 9 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2018-19 जिल्हास्तरीय समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा  नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह अन्य संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या डोंगरी क्षेत्रात संपूर्ण शिराळा तालुका, कडेगाव तालुक्यातील कोतवडे, सोनसळ, शिरसगाव आणि सोनकिरे ही चार गावे तसेत खानापूर तालुक्यातील देविखिंडी, रेणावी, वासुंबे, कुर्ली आणि पारे ही पाच गावे येतात. या गावांमध्ये डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी अनुज्ञेय निधीपैकी 25 टक्के निधी अंगणवाडी कामांसाठी राखीव ठेवला जातो. तसेच, प्राथमिक शिक्षण, बंधारे जलसिंचनाची कामे, रस्ते विकास, पाणीपुरवठ्याची कामे अन्य मूलभूत सुविधांची कामे केली जातात.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्ष सन 2018-19 साठीही 2 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 कोटी 40 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून आमदार शिवाजीराव नाईक, आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विविध कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, उपलब्ध निधीच्या प्रमाणात सर्व लोकप्रतिनिधींनी कामांचा प्राधान्यक्रम द्यावा. तसेच ही कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी स्वागत केले. तसेच, डोंगरी विकास कार्यक्रमाची माहिती विषद केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गत वर्षीच्या कामांचा आढावा घतला. यावेळी सहायक नियोजन अधिकारी डी. एस. पवार आणि ए. बी. पाटील, लेखाधिकारी एस. आर. पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा