बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देणारे बना -जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : भारत हा तरूणांचा देश असून तरूणांमध्ये अफाट क्षमता आहे. हुशार, होतकरू तरूणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वत: उद्योग-लघु उद्योग उभारावेत रोजगार देणारे बनावे, असे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर यांनी केले.
    जिल्हा माहिती कार्यालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय सांगली येथे आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आयटीआयचे प्राचार्य व्ही. बी. सोनवणे, उपप्राचार्य के. के. दाभणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा अग्रणी बँकेचे आर्थिक साक्षरता केंद्रप्रमुख पी. आर. मिठारे, श्रीमती भाग्यश्री मगदूम आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
    जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर म्हणाले, होतकरू उद्योजक होवू इच्छिणाऱ्या तरूणांनी मुद्रा बँक, स्टार्टअप् इंडिया, स्टँडअप् इंडिया, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील विविध योजना आदिंचा लाभ घेवून व्यवसाय निर्मिती व्यवसाय वृध्दी करावी. झटपट श्रीमंतीसाठी चुकीचे मार्ग निवडता प्रामाणिकपणे उद्योग उभा करा यश निश्चित मिळेल. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते उघडावे, इंटरनेट बँकींगचा वापर करावा, तसेच विविध बँकेत खाते उघडत असताना विमा योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
    आर्थिक साक्षरता केंद्रप्रमुख पी. आर. मिठारे म्हणाले, आर्थिक साक्षरता काळाची गरज बनली असून सद्या युवा पिढीचे वाचन कमी झाले आहे. विविध माध्यमातून ज्ञानार्जनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर वाचन करावे. त्यासाठी लोकराज्य हा चांगला माहितीचा स्त्रोत आहे त्याचा वापर करावा, असे आवाहन केले.      
    प्रास्ताविक वर्षा पाटोळे यांनी केले. आभार उपप्राचार्य के. के. दाभणे यांनी मानले. सूत्रसंचालन भाग्यश्री मगदूम यांनी केले. यावेळी संस्थेमधील तांत्रिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा