गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द - पालकमंत्री सुभाष देशमुख


सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे. कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजना चालूच राहील, अशी ग्वाही सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
तासगाव तालुक्यातील वडगाव येथील श्री ब्रम्हनाथ सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप पाटील, सरपंच उमा पाटील, तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार दीपक वजाळे, तालुका कृषि अधिकारी राजाराम शिंदे आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड होवून कॅबिनेट पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार संजय पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या शेतमाल तारण योजनेमध्ये बेदाणा मालाचा समावेश आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, तसेच गावातील प्रत्येक शेतकऱ्याने विकास सहकारी सोसायटीचे सभासद व्हावे, असे आवाहन करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, जिद्द कष्टाच्या जोरावर या भागातील शेतकऱ्यांनी कमी पाणी असतानाही द्राक्ष शेती यशस्वी केली. आता खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. ते कोट्यवधी रूपयांचा निधी खेचून आणत आहेत. त्यामुळे अपूर्ण सिंचन योजना पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार संजय पाटील म्हणाले, दुष्काळी भागातील जनतेचा सर्वांगीण विकास करणे हे आपले ध्येय असून पाण्याच्या बाबतीत राजकारण कदापि करणार नाही. सिंचन योजनांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला असून, त्याव्दारे लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
यावेळी आमदार सुरेश खाडे आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा