बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

वाळवा तालुक्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात दिनांक 1 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तो 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 283 वाळवा-इस्लामपूर 284 शिराळा (वाळवा तालुका गावे) विधानसभा मतदार संघांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या
इस्लामपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, वाळवा - शिराळा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार डॉ. शैलजा पाटील आणि सरस्वती पाटील उपस्थित होत्या.
नागरिकांनीही 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत नजीकच्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करावी किंवा www.ceomaharashtra.com या संकेतस्थळावर नावाची खात्री करावी, असे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ग्रामसेवक तथा जन्म मृत्यू निबंधक यांच्याकडून प्राप्त यादीनुसार मयत मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळणी केलेली आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त दुबार स्थलांतरीत मतदारांची नावेही मतदार यादीमधून वगळणी केलेली आहेत. त्याअनुषंगाने मतदारांनी नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा मतदार मदत केंद्र, तहसिल कार्यालय इस्लामपूर येथे संपर्क साधून मतदार यादीमध्ये नावाची खात्री करावी. मतदार यादीमध्ये नाव नसल्यास मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 6 चा अर्ज जन्म तारखेचा रहिवाशी पुराव्यासह निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय इस्लामपूर येथे जमा करावा. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी www.nvsp.in अथवा www.ceomaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनव्दारे मतदार आपले नाव नोंदवू शकतात. तसेच मतदार यादीमधील तपशिलामध्ये दुरूस्ती करणे, मतदार यादीमधून नाव कमी करणे एकाच मतदार संघामधील पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा