शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी - पालकमंत्री सुभाष देशमुख

आदर्श शिक्षक व आदर्श पतसंस्था पुरस्कार वितरण
सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : शिक्षकांनी पुस्तकातील धडे देण्याबरोबरच, वैभवशाली राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
जतमध्ये लायन्स लायनेस क्लबच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक आदर्श पतसंस्था पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. डॉ. रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, डॉ. रवींद्र आरळी, बालगाव आश्रमाचे अमृतानंद स्वामी, गोपाल बजाज, उपनिबंधक नीलकंठ करे आदि मान्यवर उपस्थित होते.
    आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शिक्षकांनी शैक्षणिक पारंपरिक व्यवस्थेत परिवर्तनासाठी केवळ गुणांच्या मागे लागता, विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्याला वाव द्यावा, प्रोत्साहन द्यावे. तसेच, विद्यार्थ्यांना व्यावहारिक धडे द्यावेत. अर्थकारण, बँकिंग व्यवस्था शिकवावी. थोर पुरुषांच्या चारित्र्याची माहिती देतानाच, स्थानिक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक बांधिलकीचे महत्व कोरले जाईल, असे ते म्हणाले.
    पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा विचार केला जाई. पण सध्या उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, असे मानले जात आहे. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थाच्या जीवनात शेती आणि उद्योजकतेचेही बीज पेरावे. पालकांना विश्वासात घेऊन आठवड्यातून ठराविक वेळ स्वच्छतेसाठी राखून ठेवा. स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता हीच सेवा या अभियानात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. सहकाराचा स्वाहाकार करता, सहकारातून महाराष्ट्राला देशात आदर्श बनवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी, राष्ट्र बलशाली करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण मूल्ये जपून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवावेत. सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास संपादन करावा. तसेच, समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण कराव्यात. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, असे ते म्हणाले.
    यावेळी आमदार विलासराव जगताप, गोपाल बजाज, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक घनश्याम चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
    यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच आदर्श पतसंस्था पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच, कराटे स्कूलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल बोर्गी येथील सहारा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
    प्रास्ताविकात डॉ. रवींद्र आरळी यांनी लायन्स क्लबचे कार्य, पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली. तसेच, पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार लवकरच सहकार तत्वावर रुग्णालय स्थापन करण्याची ग्वाही दिली. स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे यांनी तर सदस्य संदीप लोणी यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील शिक्षक, शिक्षिका, पतसंस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा