मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

मराठा समाजातील विद्यार्थिनीसाठी राज्यातील पहिले वसतिगृह सांगली येथे सुरू अद्ययावत सुविधा देवून हे वसतिगृह राज्यात रोल मॉडेल करा - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 11, (जि.मा.का.) : सकल मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणासह अन्य सुविधा देण्याबाबत करण्यात आलेल्या अनेक मागण्यांची पूर्तता गेल्या वर्षभरापासून शासन प्राधान्याने करत आहे. मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राज्य शासन अनेक ठिकाणी वसतिगृह सुरू करत आहे. मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी राज्यातील पहिले वसतिगृह सांगलीत आज सुरू करत असून, या वसतिगृहात सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांसह अद्ययावत सुविधा द्याव्यात आणि हे वसतिगृह उत्तम रीतीने चालवून राज्यातील रोल मॉडेल करावे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी मोहिते हाईटस, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सच्या पाठीमागे, विश्रामबाग, सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख होते. याप्रसंगी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णॣ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा समाजाला आरक्षण  देण्याबाबत शासन अत्यंत सकारात्मक आहे. सध्याचे शासन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही देवून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाप्रमाणेच भरघोस तरतुदी करण्यात येत आहेत. गतवर्षी 2 लाख 54 हजार विद्यार्थ्यांची 654 कोटी शैक्षणिक फी शासनाने भरली आहे. यावर्षी विविध प्रकारच्या 605 अभ्यासक्रमांसाठी निम्म्या फी मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ज्या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांची 100 टक्के फी घेतली असेल, त्यांना 50 टक्के फी परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समाजात शांतता राखण्यासाठी कायद्याचा धाक असला पाहिजे, असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलकांवर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांपैकी ज्या गुन्ह्यामध्ये दगडफेक झालेली नाही, कोणतीही हिंसा झाली नाही, तोडफोड झालेली नाही, केवळ आंदोलनामध्ये सहभाग होता अशा प्रकारच्या केसेस तात्काळ मागे घेण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.
शासनाने नियुक्त केलेल्या समितीने मराठा आरक्षणासंदर्भातला प्रगती अहवाल न्यायालयाला सादर केल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे सिध्द करण्यासाठी तज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. मराठा समाजातील तरूणांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांसाठी कर्ज देण्यात येत आहे. या कर्जाच्या परतफेडीची हमी शासनाने घेतली आहे. या महामंडळावर नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने महामंडळाचे कामकाज गतीमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली असून मराठा समाजातील जे विद्यार्थी पीएच.डी शिक्षणासाठी परदेशी जातील त्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सांगली येथे राज्यातील मुलींचे पहिले वसतिगृह सुरू केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे तसेच या वसतिगृहाला लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर मदत केल्याबद्दल लोकप्रतिनिधी अन्य दानशूर व्यक्तींचे अभिनंदन करून सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन अत्यंत सकारात्मक आहे. शासकीय नोकरीत 16 टक्के जागा राखीव ठेवून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन अत्यंत संवेदनशीलपणे तत्परतेने निर्णय घेत आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हे वसतिगृह लोकसहभागातून चालणारे आदर्श मॉडेल व्हावे असे सांगून वसतिगृहात शिकणाऱ्यांनी भविष्यात सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी सांगली येथे सुरू होत असलेल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची दक्षता घेण्यात आली असून या ठिकाणी सर्व सौरऊर्जा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय यासह सर्व अद्ययावतसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या इमारतीच्या भाड्यापोटी दरमहा 50 हजार रूपये अन्य अनुषांगिक सुविधा आमदार सुधीर गाडगीळ देणार असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इमारतीचे मालक शरद मोहिते, प्रविण डोंबे यांनीही अत्यंत दिलदारपणे या वसतिगृहासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून विविध संस्थांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुरेश खाडे यांनी दरमहा 5 हजार रूपये या वसतिगृहास देण्याचे जाहीर केले. तसेच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी यांनी दै. सकाळ दै. दक्षिण महाराष्ट्र केसरीचा अंक या वसतिगृहास मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.
प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी केले. वसतिगृह लाभार्थी उत्कर्षा पवार मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसतिगृह सुरू करण्यामध्ये तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, मंडल अधिकारी सतिश साळुंखे, राजू कदम, तलाठी कीर्ती कुमार धस, विक्रम कांबळे, तात्यासो पाटील, वसतिगृह इमारतीचे मालक शरद मोहिते, प्रविण डोंबे यांचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थिनी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा