शुक्रवार, १४ जुलै, २०२३

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत - विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्प, पि. आय. यु., कोल्हापूरचे विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. मूल्य साखळी विकसीत करणे व त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीमध्ये सहभाग वाढविणे या प्रमुख उद्देशाने मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. तीसऱ्या टप्यामध्ये मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी/लाल), व फुलपिके पूर्वीच्या 11 पिकांसह नवीन चार पिकांचा (आंबा, काजू, लिंबू आणि पडवळ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा याअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स/असोशिएसन्स) आणि मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्था बरोबर सक्रियपणे कामकाज करीत असलेल्या संस्था जसे अँग्रीगेटर/ प्रक्रियादार/निर्यातदार/ मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था/कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे. मॅग्नेट प्रकल्पातील पहिल्या दोन टप्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व लोकसंचलीत साधन केंद्र यांचा मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळालेला होता. मॅग्नेट प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षाचा असून, तीसऱ्या टप्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीसऱ्या टप्यात नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ www.msamb.com या संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष व कागदपत्राची चेकलिस्ट, संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्पाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय.यु), तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, श्री. छत्रपती शाहू मार्केट यार्ड, विभागीय कार्यालय- कोल्हापूर येथे छापील प्रतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील, असे डॉ. घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा