गुरुवार, १३ जुलै, २०२३

एक रुपया टोकन रक्कम भरून पीक विमा काढून नैसर्गिक आपत्ती व जोखमीपासून पीक सुरक्षित करून घ्या

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : सर्व समावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये एक रुपया भरून पीक विमा काढून घ्यावा. जिल्ह्यात अधिसूचित मंडळ निहाय भात, ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद व कापूस इत्यादी पिकांचा शेतकरी विमा उतरवू शकतात, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगामाकरीता जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया टोकन रक्कम भरून पीक विमा काढून घ्यावा व स्वतःचे पीक नैसर्गिक आपत्ती व जोखमीपासून सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी केले आहे. विमा हप्ता भरण्याची सोय आपले सरकार ग्राहक सेवा केंद्र (CSC), खाते कार्यरत असणारी बँक शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) येथे असून विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप हंगामाकरीता जोखमीच्या बाबी पुढीलप्रमाणे. प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे - हंगामातील अपुरा पाऊस व प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अनुसूचित मुख्य पिकाची अपेक्षित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेली नुकसान - हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत सर्वसाधारण काढणीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये मागील लगतच्या सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणी पासून काढणे पर्यंतचा कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट - दुष्काळ, पावसातील खंड, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव भुस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळताना येणाऱ्या जोखमी मुळे पिकाच्या उत्पादनात येणाऱ्या घटनेपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती - गारपीट, भुस्खलन, विमा क्षेत्र जलमय झाल्यास,ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून निश्चित करण्यात येईल यामध्ये शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवणे बंधनकारक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई - ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून काढणीनंतर सुखवण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्याचा आत (१४दिवस) गारपीट चक्रीवादळ,चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, असे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा