शनिवार, २२ जुलै, २०२३

बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मियांनी सामाजिक सलोखा राखावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांचे आवाहन

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) :- बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर गाव, परिसर, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केले आहे. बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, मिरज उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर आदि उपस्थित होते. श्री. पारधी यांनी बेडग येथील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभागाकडून माहिती जाणून घेतली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. तत्पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज बेडग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्वागत कमान जागेची पाहणी करून माहिती घेतली. तद्नंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद साधला व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. बेडग येथील भेटी प्रसंगी मिरज उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, बेडगचे सरपंच उमेश पाटील आदि उपस्थित होते. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा