गुरुवार, १३ जुलै, २०२३

रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

सांगली, दि. १३ जुलै (जि.मा.का.):- रस्ते सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व आरटीओ विभाग आणि महानगरपालिकेने समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांतिकुमार मिरजकर, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी यांच्यासह पोलीस, आरटीओ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी आपत्कालीन उपाययोजना करण्यास संबधित यंत्रणेने प्राधान्य द्यावे. नजीकच्या काळात सण, उत्सव सुरू होत आहेत यासाठी रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. खड्डे भरताना आवश्यकती खबरदारी घेण्यात यावी. वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी अशा सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, विना हेल्मेट वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक, वाहन चालवताना सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, ओव्हरस्पीड, विमा नसलेली वाहने चालवणे, काळी-पिवळी टॅक्सी, विना परवाना प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट व मॉडीफाय करून वाहने वापरणे याबाबत पोलीस व आरटीओ विभागाने कसून तपासणी करावी. या तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा