मंगळवार, ४ जुलै, २०२३

शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे - वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ

सांगली दि. 4 (जि.मा.का.) : आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश केल्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहु भागात होते. कोरडवाहु भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पध्दती टिकून रहावी, यासाठी अटल भूजल योजनेतून प्रचार प्रसिध्दी करण्यात येत असून शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी केले. सन 2023 हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढावे व अटल भूजल योजनेतील गावांमध्ये शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील पिकांची लागवड करावी म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून अटल भूजल योजनेतील समाविष्ठ कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, बनेवाडी, मोघमवाडी, थबडेवाडी तसेच जत तालुक्यातील बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, जिरग्याळ या गावामध्ये मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कवठेमहांकाळचे तालुका कृषि अधिकारी एस.जी. तोडकर, कृषि तज्ज्ञ नागनाथ पाटील, बोरगावचे नामदेव पाटील, बोरगावचे ग्रामसेवक श्री. बनसोडे, वनराई संस्थेच्या समन्वयक अंजली वाघे, कृषि तज्ज्ञ व लाभार्थी उपस्थित होते. तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे, आहारामध्ये वापर वाढविणे, त्यासाठी प्रचार व प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र पुरस्कृत व जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यामधील ९५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये जलसुरक्षा आराखड्यामध्ये सूचविल्याप्रमाणे पुरवठा आधारित व मागणी आधारित कामे सुरु करण्यात आलेली आहेत. भूजलातील पाण्याची होत असलेली घसरण थांबविणे व कार्यक्षम पाण्याचा वापर करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे, कमी पाण्यावरील पिकांची लागवड करणे, प्लॉस्टिक मल्चिंगचा वापर करणे, मुरघास बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत असून सूक्ष्म सिंचनासाठी वाढीव २५ ते ३० टक्के अनुदान योजनेमधून देण्यात येत आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा