शुक्रवार, ७ जुलै, २०२३

पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का) : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा योजनेचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रूपये देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र धारकाकडून शेतकऱ्यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा