मंगळवार, ४ जुलै, २०२३

खरीप पिकासाठी लाभ मिळणार फक्त एक रुपयात पीकविमा कवच

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप विमा उतरविण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाचा खरीप हंगाम 2023 ते आणि आगामी रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीतील खरीप व रबी हंगामातील पिकासाठी ही 'सर्वसमावेशक पीक विमा योजना (कप अँड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास मंजुरी दिली आहे. या विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ती ऐच्छिक आहे. शेतकऱ्याव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेचे उद्देश पिकांच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे, स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे. नुकसान भरपाई हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग, बीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात, ऊस व ताग पीक वगळून) भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान. 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे. समाविष्ट पिकनिहाय तालुके भात (जि) - वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा. ख. ज्वारी - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ. बाजरी - मिरज, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ. तुर - जत. मका - मिरज, वाळवा, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ. उडीद - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ. मुग - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ. भुईमुग - मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ. सोयाबीन - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ. कापुस - आटपाडी. पीकनिहाय तालुक्यातील अधिसूचित मंडळामध्ये पिकविमा लागू आहे. वातावरणात होत असलेला बदल व पावसाची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी जिल्ह्यात योजना लागू आहे. सर्व शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा पीक विमा घ्यावा, योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांचे ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. केवळ एक रुपया पीकविमा हप्ता भरून शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पीक विमा योजना मध्ये सहभागी व्हावे व पिकविमा कवच मिळवावे. सांगली जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती झालेली असून टोल फ्री क्र. 1800 4195004 असून e-mail: pikvima@aicofindia.com असा आहे. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा