गुरुवार, १३ जुलै, २०२३

जल जीवन मिशन मधील ३७ गावातील योजनांच्या कामांना मान्यता जलजीवन मिशनमधील कामे 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. १३ जुलै (जि.मा.का.): जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२३-२०२४ आराखड्यामधील जिल्ह्यातील 37 गावांमधील योजनांच्या कामांना जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जल जीवन मिशन योजनेतील कामे १५ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२३-२०२४ आराखड्यातील योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता संजय येवले आदि उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या कामांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या १७ आणि सौरऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेच्या २० कामांचा समावेश आहे. तसेच भोसे येथील घरगुती नळ जोडणीच्या कामालाही बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जलजीवन मिशन मधील कामे गतीने करण्याबरोबरच कामाची गुणवत्ता आणि दर्जा चांगला असावा. डिसेंबर 2023 अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा